मनमाडमध्ये पाणी हा एकच विषय
उन्हाळ्याच्या सुटीत मनमाड येथे माहेरी गेलेल्या विवाहितेला आठ दिवसांत आईच्या घरून माघारी परतावे लागले. याच ठिकाणी आत्याच्या भेटीस गेलेल्या महाविद्यालयीन युवतीलादेखील दोन-तीन दिवसांत मनमाड सोडणे क्रमप्राप्त ठरले. कारण काय तर पाण्याचे दुर्भिक्ष! मनमाडकरांना सद्य:स्थितीत कोणी पाहुणे घरी येणार म्हटले तरी अंगावर काटा उभा राहतो. स्वत:च्या कुटुंबाची पाण्याची निकड भागविण्याचीच भ्रांत आहे, तिथे पाहुण्यांसाठी पाणी कुठून आणणार, असा त्यांचा रास्त प्रश्न. दुसरीकडे पाणीटंचाईला तोंड देताना त्रस्तावलेल्या अनेक मनमाडकरांनी सुटीच्या काळात नाशिक शहरासह जिथे अशी स्थिती नाही, अशा ठिकाणच्या नातेवाईकांकडे तात्पुरता आसरा शोधला आहे. अर्थात, दुष्काळामुळे नात्याची वीण कुठे नकळत उसविली जात आहे तर, कुठे याच कारणास्तव ती अधिक घट्टही होताना दिसते. रणरणत्या उन्हात पाणीटंचाईच्या बिकट स्थितीमुळे दुष्काळग्रस्तांच्या नानाविध छटा समोर येत आहेत.
मध्य रेल्वेच्या मार्गावरील मनमाड हे जंक्शन असणारे महत्त्वाचे स्थानक. नांदगाव तालुक्यातील या शहराची लोकसंख्या आहे, सव्वा लाखाच्या आसपास. जिल्ह्य़ात मुबलक पाऊस झाला तरी टंचाईचे संकट मनमाडच्या पाचवीला पुजलेले. एरवी वर्षांतील कित्येक महिने पाच ते दहा दिवसांआड होणारा पाणीपुरवठा मनमाडकरांना नवीन नाही. त्यामुळे या स्थितीशी दोन हात करण्याची त्याची मानसिक तयारी असते, परंतु यंदाच्या उन्हाळ्यात हा कालावधी ३५ दिवसांआड म्हणजे महिन्याहून अधिक काळातून केवळ एकदाच पाणीपुरवठा होण्यावर गेला, तेव्हा त्यांची दुष्काळाची लढण्याची शक्ती आपसूक क्षीण झाली. पाणी अक्षरश: जीवन-मरणाचा प्रश्न ठरला. स्थानिक पातळीवरील भयावह स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने नवीन आवर्तन देत पुढील दोन महिने मनमाडकरांची तहान भागविता येईल अशी तात्पुरती व्यवस्था केली. मात्र या उपायाद्वारे फार फार तर १५ ते २० दिवसाआड पाणीपुरवठा करता येईल. या विचित्र स्थितीमुळे काहींनी उन्हाळी सुटीत मनमाड सोडून नातेवाईकांकडे जाणे पसंत केले. या काळात कोणी पाहुणे मनमाडला आल्यास स्थानिकांच्या जिवाची अक्षरश: घालमेल होत आहे.
कित्येक दिवसांतून एकदाच येणाऱ्या पाण्याची साठवणूक करण्यासाठी प्रत्येक घरात वेगवेगळ्या टाक्यांची खास व्यवस्था करणे भाग पडले आहे. ज्या दिवशी पाणी येणार तेव्हा सुटी घेऊन पाणी भरणे हे एकमेव काम सदस्यांना करावे लागते. कारण, उपरोक्त वेळेत पाण्याची अधिकाधिक साठवण न झाल्यास पुढील पाच आठवडे त्यांची ‘परीक्षा’ असते. साठविलेले पाणी आरोग्यास अपायकारक ठरू नये म्हणून शुद्धीकरण यंत्रणा बहुतेकांनी कार्यान्वित केली आहे. काही कुटुंब साठविलेल्या पाण्याचा वापर दैनंदिन धुणे-भांडे व तत्सम कामांसाठी करतात तर पिण्याचे पाणी टँकर वा जारमार्फत खरेदी केले जाते. यामुळे तीन ते चार सदस्यांच्या कुटुंबाला महिन्याकाठी दीड ते दोन हजाराचा अतिरिक्त भार सोसावा लागत आहे. असा खर्च पेलवू न शकणाऱ्या कुटुंबांना कूपनलिका वा तत्सम मार्गाने पाण्याची तजवीज करावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे.
या एकंदर स्थितीत पाहुण्यांसाठी पाण्याची उपलब्धता करणे अवघड आहे. यामुळे सुटीच्या काळात माहेरी मनमाडला येणाऱ्या मुलीसाठी आईने आधीच पाण्याची तजवीज करून ठेवली. आयुडीपी भागातील भवानी चौक या ठिकाणी मुलगी व नातवंडे आठ दिवस राहिले. पाण्याची स्थिती पाहून नंतर आम्हीच नाशिकला परतण्याचा निर्णय घेतल्याचे शीतल देशमुख यांनी सांगितले. माहेरी आई एकटीच असल्याने आठ दिवस त्यांना वास्तव्य करता आले. पाच अथवा अधिक सदस्य असल्यास पाहुणे येणार म्हटल्यावर संपूर्ण कुटुंब चिंताग्रस्त होते. नाशिकला एचपीटी महाविद्यालयात शिक्षण घेणारी नेहा जावळे मनमाडच्या हुडको वसाहतीत वास्तव्यास असलेल्या आत्याकडे गेली होती, परंतु पाण्यासाठी संबंधितांची होणारी ओढाताण लक्षात घेऊन आपण दोन ते तीन दिवसांत माघारी परतण्याचा निर्णय घेतल्याचे तिने नमूद केले. पाण्यामुळे उद्भवलेल्या स्थितीची अशी असंख्य उदाहरणे या ठिकाणी सापडतात. अनेकांनी तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर केल्यामुळे स्थानिक बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल थंडावली आहे.
टंचाईमुळे नातेवाईकांचीही ‘परीक्षा’
उन्हाळ्याच्या सुटीत मनमाड येथे माहेरी गेलेल्या विवाहितेला आठ दिवसांत आईच्या घरून माघारी परतावे लागले.
Written by अनिकेत साठे
First published on: 03-05-2016 at 02:42 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water scarcity in nashik