जायकवाडीच्या पाण्यावरुन पुन्हा वाद

जायकवाडीसाठी पाणी सोडण्याकरिता शासकीय यंत्रणा तयारीला लागली असताना दुसरीकडे या विरोधात आंदोलनाचे सत्रही सुरू झाले आहे. दारणा धरणातून पाणी सोडू नये याकरिता गुरुवारी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी धरणावर धडक देत ठिय्या आंदोलन केले. यावेळी ‘भाजप’ सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सरकारने बळाचा वापर करून पाणी सोडण्याचा प्रयत्न केल्यास जलसमाधी घेण्याचा घेण्याचा इशारा माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी दिला.

जायकवाडीची तूट भरून काढण्यासाठी नाशिक,नगरमधील धरणांमधून ८.९९ ‘टीएमसी’ पाणी सोडण्याचे आदेश झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने तयारीला वेग दिला आहे. शुक्रवारपासून धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन आहे. विरोधाची शक्यता गृहीत धरून पोलीस बंदोबस्तात ही कार्यवाही होणार आहे. भाम, भावली धरणातील पाणी दारणा धरणात आणले जाणार असून पाणी चोरी होऊ नये म्हणून काठावरील गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, राजकीय पातळीवर विरोधही सुरू झाला आहे. सर्वपक्षीय विरोधकांनी रामकुंडात उतरून पाणी सोडण्याला विरोध दर्शविला असताना आता ग्रामीण भागात आंदोलन सुरू झाले आहे. दारणा परिसरातील संतप्त शेतकरी मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली धरणावर पोहोचले. यावेळी शासन, जलसंपदा विभागाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दारणा समूहातून पाणी सोडण्यास आमचा विरोध आहे. दोन तास ठिय्या आंदोलन करत स्थानिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. पाणी सोडण्याचा निर्णय इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्य़ासाठी अन्यायकारक आहे. कोणत्याही स्थितीत पाणी सोडू दिले जाणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

मनमाड, येवल्यावर भीषण टंचाईचे संकट

जायकवाडीला पालखेड धरण समूहातून पाणी दिले जाणार असल्याने आधीच दुष्काळाने होरपळणाऱ्या मनमाड, येवला शहरासह मनमाड रेल्वे स्थानकावरील टंचाईची तीव्रता अधिकच वाढणार आहे. पालखेडचे दोन आवर्तन रद्द होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मनमाड, येवल्यासाठी पालखेड धरणांतील राखीव साठय़ात मोठी कपात होण्याची भीती व्यक्त होत आहे. नैसर्गिक समतोल बिघडल्याने मनमाडला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण या वर्षी कोरडेठाक आहे. तर येवल्याच्या तलावातही मृतसाठा आहे. यापुढे सारी भिस्त पालखेड धरण समूहांतील आरक्षणावर राहील. असे असताना मराठवाडय़ाला पाणी सोडले जात असल्याने पिण्याच्या पाण्यात कपात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मनमाडला सध्या २० दिवसाआड तर येवल्याला तीन-चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो. स्थानिक आमदार, शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Story img Loader