नाशिक जिल्ह्यातील आदिवासीबहुल त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही गावांना पाणी टंचाई नवी नाही. फेब्रुवारीच्या प्रारंभापासूनच तालुक्यातील टाके देवगाव येथे टंचाई जाणवण्यास सुरूवात झाली आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी टाके देवगाव ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्यात आला.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात जलजीवन योजनेचे काम काही ठिकाणी सुरू तर काही ठिकाणी बंद आहे. टाके देवगाव ग्रामपंचायतपैकी गणेशनगर, बरड्याची वाडी, लोणवाडी, धाराची वाडी या ठिकाणी जलजीवन योजनेच्या कामास अद्यापही सुरुवात नाही. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी येथील महिलांना कधी रात्री नदीवर पायपीट करत जावे लागते. या ठिकाणी जलजीवन योजनेचे काम तत्काळ सुरु करून पाणी पुरवठा सुरू करावा, या मागणीसाठी टाके देवगाव येथील ग्रामस्थ एकत्र आले. ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढत प्रशासनाच्या उदासिनचा निषेध करण्यात आला. आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून अधिकाऱ्यांनी कार्यालयातून काढता पाय घेतला.

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जलजीवन योजनेच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, बरड्याची वाडी आणि धाराची वाडी येथे पाण्याची स्वतंत्र टाकी बांधावी, ग्रामपंचायतीकडून १५ वा वित्त आयोग आणि पेसामधून पाणी पुरवठा योजनेवर करण्यात आलेल्या कामाची चौकशी करावी, जलजीवन योजनेसाठी टाके देवगाव धरणातून पाणी मिळावे, या मागण्या करण्यात आल्या आहेत.

पाणी योजना पूर्ण न झाल्याने लोकांना टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाशी यासंदर्भात चर्चा सुरू आहे.- भगवान मधे (एल्गार कष्टकरी संघटना)

Story img Loader