नाशिक – उन्हाची तीव्रता वाढत असल्याने भूजल पातळी कमी होत आहे. शहरातील काही भागात पाण्यासाठी ओरड कायम आहे. नवीन नाशिक परिसरातील चेतना नगर अर्थात प्रभाग क्रमांक ३१ मध्ये कृत्रिम टंचाई जाणवू लागली आहे. दोन दिवसांपासून वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्याचे कारण विचारल्यावर पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. पाण्यासाठी नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी माजी नगरसेवकांनी टँकर मागवून लोकांना पाणी उपलब्ध करून दिले. या कृत्रिम टंचाईचा सर्वाधिक त्रास महिलांना होत आहे.

नवीन नाशिकमधील प्रभाग क्रमांक ३१ मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे. काही दिवसांपासून प्रभागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. बुधवारी नियोजित वेळेत परंतु, कमी दाबाने पाणी आले. अवघ्या १० मिनिटात पाणी गेले. याबाबत माजी नगरसेवक, महानगरपालिका पाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, तांत्रिक कारणांमुळे पाणी पुरवठा पुरेसा होत नसल्याचे सांगितले. थोड्या वेळात कमी दाबाने पाणी आले आणि गेले. महिलांना पिण्यासाठी तसेच रोज वापरण्यासाठी पाणी भरता आले नाही. यामुळे महिलांची घरातील इतर कामे खोळंबली. निवासी इमारतींमध्ये पाण्यासाठी काहींना पदरमोड करत टँकर मागवावे लागत आहेत. काहींनी माजी नगरसेवकांना सातत्याने दूरध्वनी करुन पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी केली. पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. गुरूवारी पुन्हा कमी दाबाने पाणी आले. नियोजित वेळेआधीच पाणी बंद झाले. याविषयी संबंधितांकडे विचारणा केली असता काही अडचणीमुळे तसे झाल्याचे सांगितले. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अर्ध्या तासाच्या अंतराने पाणी आले. नियोजित वेळेपेक्षा जादा वेळ पाणी सोडण्यात आले.

याविषयी स्थानिक रहिवासी अनिल भागवत यांनी चेतना नगर परिसरात पाणी समस्या कायमची असल्याची व्यथा मांडली. याबाबत माजी नगरसेवकांनी सातत्याने आवाज उठवूनही लक्ष दिले जात नाही. बुधवारी पाण्याचा प्रश्न बिकट होता. माजी नगरसेवकांकडे पाठपुरावा करुन इमारतीसाठी पाणी मागवले. गुरूवारी पुन्हा तसेच चित्र होते. नियोजित वेळेनंतर पाणी आले. पाण्याच्या अनियमित पुरवठ्याला कोण जबाबदार ? पाणी कमी दाबाने आल्यावर एकच टाकी भरते. जादा दाबाने आले तर त्या वेळेत वीज गायब होते. असा वीज आणि पाण्याचा लंपडाव सुरू असतो, असे भागवत यांनी सांगितले. पाणी पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी तांत्रिक कारणांचा पाढा वाचत. पाणीप्रश्न बऱ्यापैकी नियंत्रणात आणल्याचा दावा केला.

चेतना नगर, पाथर्डी फाटा, पांडव नगरी,अंबिका कॉलनी यासह अन्य भागात पाणी टंचाई जाणवत आहे. या ठिकाणी मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणावर अलिशान इमारती बांधण्यात येत आहेत. जुनी जलवाहिनी, नवी जलवाहिनी यातील काही तांत्रिक अडचणी आहेत. या शिवाय अनेक ठिकाणी कूपनलिका खोदल्या आहेत. या सर्व कारणांमुळे पाणी असूनही परिसराला कृत्रीम टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.