रामकुंडसह टाळकुटेश्वपर्यंतचे पात्र काँक्रि टमुक्त करण्याची मागणी
नाशिक : गोदावरी नदीला काँक्रीटीकरणमुक्त करून प्राचीन कुंड मूळ स्वरूपात पुनर्जीवित करण्यासाठी चाललेल्या प्रक्रियेत पात्रात जिवंत जलसाठा असल्याचे अधोरेखित झाले आहे. रामकुंडाजवळ विंधन विहिरीला पाणी लागले. दीड इंचाच्या विंधन विहिरीतील पाण्यामुळे गोदापात्रात पाणी वाहू लागले. प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या विंधन विहिरीला पाणी लागल्याने काँक्रीटीकरणाखाली पाण्याचे स्त्रोत कायम असल्याला बळ मिळाले आहे.
शहरातून वाहणारे गोदावरी नदीचे पात्र काँक्रीटमध्ये लुप्त झाले आहे. बऱ्याच भवती न भवतीनंतर स्मार्ट सिटी कंपनीने प्रकल्प गोदाअंतर्गत गोदावरी नदीतील काँक्रीटीकरण काढण्याचे काम काही महिन्यांपूर्वी हाती घेतले होते. जेसीबी आणि इतर यंत्रांच्या साहाय्याने पात्रातील काँक्रीट फोडले जात आहे. पहिल्या टप्प्यात दुतोंडय़ा मारुती ते गाडगे महाराज पुलापर्यंतच्या दोन कुंडाचे काम झाले असून अजून तीन कुंडांचे काम बाकी आहे. या पात्रात १७ प्राचीन कुंड आहेत. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार याचिकाकर्ते म्हणून देवांग जानी यांनी महापालिकेला सविस्तर कुंडांची माहिती नाशिक गॅझेटियर आणि डीएलआर नकाशातून दिली होती.
पहिल्या टप्प्यात पाच प्राचीन कुंड असून यामध्ये अनामिक, दशाश्वमेध, रामगया, पेशवे आणि खंडोबा कुंडाचा समावेश आहे. रामकुंड आणि लगतच्या भागातील काँक्रीटीकरण काढायचे असल्यास पात्रात जिवंत जलसाठे आहे की नाही, याची छाननी करण्याबाबत स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळात बरीच चर्चा झाली. नदीपात्रात जिवंत जलस्त्रोत सापडल्यास त्यादृष्टीने विचार करण्याचे मान्य करण्यात आले. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अहवालाचा आधार घेण्यात आला.
या यंत्रणेने विंधन विहिरीसाठी गोमुख आणि दुसरे रामकुंडालगतच्या अहिल्यादेवी कुंडाजवळचे ठिकाण सुचविले होते. त्या अनुषंगाने अहिल्यादेवी कुंडालगतच्या ठिकाणी अवघ्या ६० ते ७० फूट अंतरावर पाणी लागल्याचे जानी यांनी सांगितले. काँक्रीटीकरणाखाली जलस्त्रोत सुस्थितीत असल्याचे उघड झाले आहे.
गोदावरीचे पात्र काँक्रीटमुक्त करून प्राचीन कुंड पुनर्जिवित करताना कुंडाच्या रचनेत कुठलाही बदल करू नये. त्यांचे खोलीकरण अथवा विस्तारीकरण करू नये, याकडे आधीच लक्ष वेधण्यात आले आहे. विकास कामात नदी पात्राचे आधीच बरेच नुकसान झाले. पात्रातील तळाचे सिमेंट, काँक्रीट काढतांना कुंडातील स्त्रोतांना इजा होणार नाही, यासाठी विशिष्ट उपकरणाचा वापर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गोदावरी नदी पात्रातील रामकुंडसह उर्वरित काँक्रीटीकरण काढण्यासाठी तसेच २०१६ च्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अहवालात सुचविल्यानुसार नदीपात्रात जिवंत जलस्त्रोतांचा शोध घेण्यासाठी रामकुंजाजवळ (अहिल्यादेवी कुंड) नाशिक स्मार्ट सिटी कंपनीतर्फे विंधन विहिरीची चाचणी घेण्यात आली. त्यात गोदा खळखळून वाहिली. विंधनविहिरीला दीड इंचाचे पाणी लागले. आता क्षणाचाही विलंब न करता रामकुंडसह टाळकुटेश्वपर्यंतचे पात्र काँक्रीटमुक्त करावे.
– देवांग जानी (याचिकाकर्ते)