लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: कळवण तालुक्यातील सप्तश्रृंग गडाला पाणीपुरवठा करणारा भवानी तलाव भरून वाहत असतानाही गडावरील रहिवाशांना चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे
सप्तश्रृंग गड गावापासून तीन किलोमीटरवर भवानी तलाव आहे. हा तलाव भरून वाहू लागला आहे. असे असतानाही ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. एकिकडे या तलावासाठी लाखो रुपये खर्च होत असले तरी उन्हाळ्यात पुन्हा टंचाईची परिस्थिती निर्माण होते. तलावाची गळती मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. सद्यस्थितीत हंड्यात पावसाचे पाणी जमा करून धुणीभांडी करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. नळांना चार ते पाच दिवसाआड पाणी येते. त्यामुळे भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
आणखी वाचा-महसूल सप्ताहात विभागाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर, १५ लाख घेणाऱ्या तहसीलदारास पोलीस कोठडी
उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन नाही. पाण्याचे वेळापत्रक नाही. प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवकाकडून स्थानिक स्तरावर पाणी वितरणाचे नियोजन करणे अपेक्षित असताना तसे काही होताना दिसत नाही. लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी महिलांकडून केली जात आहे.