नाशिक : १२०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीच्या गळतीने शहरातील पाणीपुरवठय़ाचे नियोजन पूर्णत: कोलमडले असून ऐन पावसाळय़ात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. महापालिकेने या जल वाहिनीच्या दुरुस्तीचे कारण देत पुन्हा एकदा सातपूर आणि नाशिक पश्चिम विभागात शुक्रवार आणि शनिवार तसेच सिडको विभागात शनिवारी पाणी पुरवठा होणार नसल्याचे म्हटले आहे, आधीच्या नियोजनानुसार काही भागात कमी दाबाने पाणी
पुरवठा केला जाणार होता. परंतु, त्यात पुन्हा बदल केल्याने नागरिकांवर पुन्हा पाणीबाणीचे संकट ओढावले आहे.सातपूर-त्र्यंबक रस्त्यावरील अमृत गार्डन चौकात १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला अकस्मात झालेल्या गळतीची दुरुस्ती करूनही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. दुरुस्तीसाठी याआधी नाशिक पश्चिम आणि सातपूर विभागात सात जलकुंभावरून होणारा पाणी पुरवठा एक दिवस बंद ठेवला गेला होता. गुरुवार आणि शुक्रवार हे दोन दिवस या विभागातील अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे सांगितले गेले. परंतु, गुरुवारी पाणीपुरवठा विभागाने यात पुन्हा बदल केल्याने नागरिकांना टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम अद्यापही सुरू आहे.
कामाची व्याप्ती मोठी असून गळती पूर्णपणे बंद होत नसल्याने पर्यायी व्यवस्था करणे क्रमप्राप्त झाले आहे. या कामासाठी शुक्रवारी सकाळपासून ते शनिवारी रात्रीपर्यंत सातपूर आणि नाशिक पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा संपूर्ण दोन दिवस बंद ठेवला जाणार आहे. यात सातपुर विभागातील सातपूर कॉलनी, पपया नर्सरी, त्र्यंबक रस्ता, महाराष्ट हौसिंग कॉलनी, सातपूर गाव, स्वारबाबानगर, महादेववाडी, जे. पी. नगर, सातपूर मळे विभाग, संतोषीमातानगर, गौतमनगर, कांबळे वाडी, सातपूर कॉलनी, समतानगर, विनायक संकुल, खोडे पार्क, आठ हजार कॉलनी, कृष्णनगर, वीस हजार कॉलनी, शिवकॉलनी, सुयोजित कॉलनी, कामगार नगरचा काही भाग, विकास कॉलनी या भागाच समावेश आहे.
याशिवाय जुना प्रभाग क्रमांक २६ मधील मोगल नगर, साळुंकेनगर, वावरेनगर, शिवशक्तीनगर व चौक, आयटीआय परिसर, खुटवडनगर, मटालेनगर, आशीर्वादनगर, संजीवनगर, जाधव संकुल, पाटील पार्क, विरार संकुलचा समावेश आहे. नाशिक पश्चिम विभागातील जुना प्रभाग क्रमांक १२ मधील लवाटेनगर, संभाजी चौक, उषा किरण सोसायटी, पत्रकार कॉलनी, तिडके कॉलनी, कालिका मंदिर मागील भाग, सहवास नगर, राहुल नगर, मुंबई नाका परीसर मिलिंद नगर, मातोश्री नगर, महेश नगर, राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र परिसर, वनविहार कॉलनी, संतकबीर नगर, पारिजात नगर, समर्थ नगर महात्मानगर परिसर या भागात पाणीपुरवठा होणार नाही.
सिडको विभागासही झळ
मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्ती कामाची झळ शनिवारी सिडको विभागास बसणार आहे. या कामामुळे शनिवारी सिडको विभागात पाणीपुरवठा होणार नाही. या विभागातील जुना प्रभाग क्रमांक २५ मधील इंद्रनगरी, कामठवाडे गाव परिसर, जुना प्रभाग क्रमांक २७ मधील अलिबाबानगर, दातीर वस्ती, चुंचाळे घरकुल योजना, दत्तनगर, कारगील चौक, चुंचाळे गाव परीसर, जुना प्रभाग क्रमांक २८ मधील लक्ष्मीनगर, अंबड गाव परिसर, माऊली लॉन्स, वृंदावननगर, अंबडगांव ते माऊली लॉन्समधील पूर्व व पश्चिमेकडील परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.