नाशिक : महावितरणच्या उपकेंद्रात झालेला बिघाड आणि गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथील वाहिनीत गळती झाल्यामुळे मंगळवारी शहरात सकाळ व सायंकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. बुधवारी सकाळी शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे.
धरणांमध्ये मुबलक पाणी असताना तांत्रिक बिघाडामुळे शहराच्या पाणीपुरवठय़ात व्यत्यय आला. शहरातील सुमारे ६० ते ७० टक्के भागास गंगापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरण परिसरातील महावितरणच्या उपकेंद्रात अचानक बिघाड झाल्याने दुपारी तासभर वीजपुरवठा खंडित झाला. गंगापूर धरण पंपिंग स्टेशनमधील एका वाहिनीला दुपारी अचानक गळती सुरू झाली. तिची दुरुस्ती तातडीने करणे गरजेचे असल्याने दुपारी दोन ते सायंकाळी पाच या कालावधीत धरणातून पाणी उचलण्याचे काम थांबवावे लागले. या कारणांमुळे मंगळवारच्या सकाळ व सायंकाळच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला आहे. अनेक भागांत पुरेशा दाबाने पाणीपुरवठा झाला नसल्याच्या तक्रारी आहेत. सायंकाळी काही भागांत पाणीपुरवठा झाला नसल्याचे सांगण्यात येते. बुधवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. नागरिकांनी सहकार्य करावे, असे पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे.