मनमाड : शहराला सध्या सुरू असलेला १९ दिवसांआड होणारा पाणीपुरवठा पुन्हा एकदा १५ दिवसांआड करण्यात आला असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. अनियमित आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठय़ामुळे शहराचा पाणीपुरवठा काही दिवस विस्कळीत झाला होता. आता परिस्थिती सामान्य झाल्याने पुन्हा एकदा नागरिकांना पंधरा दिवसांआड पाणी वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ.सचिनकुमार पटेल यांनी दिली.

मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी झालेल्या वादळी पावसामुळे विद्युत वाहिन्या तुटल्या होत्या. खंडित वीजपुरवठय़ाचा परिणाम  शहराच्या पाणी पुरवठय़ावर झाल्यानंतर १५ दिवसांनी होणारा पाणीपुरवठा १९ दिवसांआड करण्यात आला होता. अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. दरम्यान  मनमाड शहरासाठी २५ जून रोजी सोडण्यात येणारे पालखेड धरणाचे आवर्तन अचानक १६ जून रोजी रात्री तेही तीन दिवसासाठी सोडल्याने पालिका प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. घाईघाईने  पाणी तलावात साठवणूक करण्यात आले आहे. भर पावसाळय़ात १९ दिवसांआड पाणीपुरवठा झाल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. 

मनमाड  शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणात मुबलक पाणीसाठा आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे वीजपंपाद्वारे जलशुद्धीकरण केंद्रात वेळेवर आणि पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. जलशुद्धीकरण प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. त्याचा परिणाम  शहरातील पाण्याच्या वितरणावर झाला आहे. त्यातच पालखेड डाव्या कालव्याचे २५ जूननंतर मिळणारे आवर्तनाचे पाणी गुरुवारी तीन दिवस दिल्याने ते आता पुन्हा लवकर मिळणार नाही. त्यामुळे एक महिना पुरेल इतके पाणी वाघदर्डी धरणात आहे. या सर्व परिस्थितीमुळे सद्या १५ दिवसांआड पाणीपुरवठा होणार आहे.

Story img Loader