शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात पश्चिमेकडून पांझण नदीला येणाऱ्या पाण्याला बांध घालून मोठय़ा प्रमाणावर पाण्याची चोरी होत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकाराने खळबळ उडाली असताना पाणी चोरी होऊनही मनमाड नगरपालिका व पोलीस यंत्रणेने कोणतीही कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
वागदर्डी धरणावर आधीच १२ बंधारे बेकायदा असून आता आणखी नव्याने बांध घालून पाणी चोरी होत असल्याने धरणातून नैसर्गिक स्त्रोतातून पाणी येण्याची उरलीसुरली आशाही आता नष्ट झाली आहे. पाणी चोरीचा हा प्रकार थांबविण्याची मागणी केली जात आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पाऊस झाल्यानंतर परतीच्या पावसाने पुन्हा गुंगारा दिला. मान्सून संपुष्टात आल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे यापुढे पाऊस पडण्याची शक्यता मावळली आहे. उपलब्ध पाणी साठय़ात पुढील नऊ महिने मनमाडकरांना काढावे लागणार आहे. सद्यस्थितीत शहराला १५ दिवसांआड जेमतेम एक तासभर पाणी पुरवठा होत आहे. सप्टेंबरमध्ये सोडण्यात आलेल्या आवर्तनामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी हे पाटोदा साठवणूक तलावातील पाणी सध्याच्या वितरण व्यवस्थेत जेमतेम नोव्हेबर-डिसेंबरपर्यंत पुरेल असे सांगण्यात येते. त्यात पाणी चोरी होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. वागदर्डी धरण कोरडे होण्याच्या मार्गावर आहे. सध्या उन्हाळ्यासारखी स्थिती असल्याने उपलब्ध जलसाठय़ाचे बाष्पीभवन झपाटय़ाने होत आहे. पालखेड धरण समुहातील पालखेड वगळता इतर धरणांची पातळी निम्म्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे पुढील आवर्तन मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे. या स्थितीत राजरोस पाणी चोरी होत असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा