‘म्हैसमाळ’मध्ये पाण्याअभावी रखडलेल्या विवाहांना सुरुवात

नाशिक : शहरातील सोशल नेटवर्किंग फोरमच्या वतीने आदिवासी पाडय़ांना टँकरमुक्त करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या जलअभियानात बहुचर्चित म्हैसमाळ या गावात पाणी पोहोचविण्यात अखेर यश आले आहे. त्याचे ग्रामस्थांनी वाजतगाजत स्वागत केले. पाण्याअभावी गावातील मुलांशी लग्न करायला मुली तयार नव्हत्या. पाणी प्रश्न सुटल्यामुळे स्थानिक तरुणांचे लग्न होण्यास सुरुवात झाली आहे. फोरमने १८ गावांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध केले असून लवकरच पेठ तालुक्यातील एकदरे आणि खोकरतळे गावातील प्रकल्पांचे लोकार्पण होत आहे.

सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळच्या ग्रामस्थांना रात्री, पहाटे विहिरीत उतरून हंडाभर पाण्यासाठी तासन्तास तिष्ठत बसावे लागत होते. तिथे फोरमच्या प्रयत्नाने ग्रामस्थांच्या दारात पाणी आले आहे. गावातील महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन नाचत, गात या पाण्याचे स्वागत केले. या प्रकल्पाचे लोकार्पण साहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश लोखंडे, भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. जयदीप निकम, फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड आदींच्या उपस्थितीत झाले. म्हैसमाळच्या पाणीटंचाईची माहिती मिळाल्यानंतर फोरमने ही समस्या सोडविण्याचा निर्धार के ला. परिसराची पाहणी केल्यावर अडीच किलोमीटर अंतरावर वर्षभर पाणी असलेले धरण असल्याचे लक्षात आले. तिथे विहीर खोदून गावात पाणी आणणे शक्य होते. या धरणाच्या काठावर शेती असलेल्या धूम कु टुंबीयांनी विहिरीसाठी मोफत जागा दिली. या जागेवर ग्रामस्थांच्या श्रमदानातून विहीर खोदण्यात आली. तिला भरपूर पाणी लागल्यावर ग्रामपंचायतीने गावात टाकी बांधली. मुंबईची करुणा ट्रस्ट, इनरव्हिल क्लब ऑफ मुंबई वेस्ट, जे. एल. नरसिम्हन यांनी पाइप, मोटार आणि इतर साहित्यासाठी मदत केली. गावकऱ्यांनी श्रमदानातून चर खोदले आणि जलवाहिनी पूर्णत्वास गेली.

मे महिन्यातच गावात पाणी आले होते. त्यामुळे या वर्षी ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल झाले नाहीत. करोनामुळे या प्रकल्पाचे लोकार्पण उशिरा करण्यात आले. राज्यातील सर्वाधिक टंचाईग्रस्त गाव म्हणून म्हैसमाळची असलेली ओळख जलअभियानामुळे पुसली गेली आहे. जलअभियानात आतापर्यंत १८ गावांमध्ये पाणी पोहोचले असून चार प्रकल्पांचे काम सुरू आहे. भाजपचे विनय सहस्रबुद्धे यांच्या खासदार निधीतून पेठ तालुक्यातील एकदरे आणि खोकरतळे गावातील प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. या प्रकल्पांचे काही दिवसांत लोकार्पण होत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

पाण्यामुळे सामाजिक प्रश्नही सुटणार

गावात पाणी नसल्याने म्हैसमाळमधील तरुणांशी लग्न करायला मुली तयार होत नसत. पंचक्रोशीत गावातील पाणीटंचाईची माहिती होती. गावचा पाणी प्रश्न सुटल्याने आता तरुणांचे लग्न होण्यास सुरुवात झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. टंचाईग्रस्त अनेक गावांत ही परिस्थिती असते. पिण्याच्या पाण्यासाठी मुलींना काबाडकष्ट करावे लागतात. त्यामुळे कुटुंबीय आपल्या मुलीचा अशा टंचाईग्रस्त गावातील मुलाशी विवाह करून देण्यास तयार नसतात. पाण्यामुळे हा सामाजिक प्रश्न सुटण्यास हातभार लागणार आहे.

 

 

Story img Loader