जळगाव : दुचाकी फिरविण्यास मिळत नसल्याने अल्पवयीन दोन मुलांनी शहरातील मुख्य बाजारपेठ भागातून खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या दुचाकी चोरीचा धडाका लावला होता. त्यांना शुक्रवारी (१४ जुलै) मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास एस. एम. आय. टी. महाविद्यालय परिसरातून पोलीस पथकाने सापळा रचत अटक केली. त्यांच्याकडून सहा दुचाकी हस्तगत केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी दिली.
शहर पोलीस ठाण्यात शनिवारी (१५ जुलै) दुपारी उपविभागीय पोलीस अधिकारी गावित यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, शहर पोलीस ठाणे हद्दीत मोठी बाजारपेठ असल्याने जिल्ह्यातील नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत असते. त्याचाच फायदा घेत काही चोरट्यांनी नागरिकांच्या दुचाकी चोरण्याचा धडाकाच लावला होता. मुख्य बाजारपेठ परिसरात दुचाकी चोरीचे प्रकार वाढले होते. त्यावरून शहर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी गुन्हे शोध पथकाला दुचाकी चोरीसंदर्भात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
हेही वाचा >>> नाशिक : रोजगार मेळाव्यात उमेदवारांना ढिसाळ नियोजनाचा अनुभव
त्याअनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक विलास शेंडे यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक किशोर पवार, सहाय्यक फौजदार बशीर तडवी, हवालदार विजय निकुंभ, उमेश भांडारकर, भास्कर ठाकरे, प्रफुल्ल धांडे, किशोर निकुंभ, गजानन बडगुजर, योगेश पाटील, राजकुमार चव्हाण, रतन गिते, तेजस मराठे, योगेश इंधाटे, अमोल ठाकूर आदींचे पथक नियुक्त करण्यात आले. शुक्रवारी (१४ जुलै) रात्री साडेबाराच्या सुमारास संशयित हे गुन्ह्यातील चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती सहायक निरीक्षक किशोर पवार, तेजस मराठे, किशोर निकुंभ यांना मिळाली.
हेही वाचा >>> १० हजार गावांमध्ये कृषी व्यवसाय संस्था; शासन आपल्या दारी कार्यक्रमात घोषणा
त्यानुसार पथकाने एस. एम. आय. टी. महाविद्यालय परिसरात सापळा रचत मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास दोन मुले दुचाकी फिरवीत असल्याचे दिसताच, त्यांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून, अधिक चौकशीत त्यांनी दुचाकी फिरविण्यास मिळत नसल्याचे सांगितले. त्यांची चौकशी सुरू असून, दुचाकी चोरीची टोळी आहे का, त्यांच्यासोबत असून कोणकोण आहेत, याबाबत चौकशी सुरू असल्याचे गावित यांनी सांगितले.