नाशिक : टळटळीत ऊन आणि प्रचंड उकाड्याने तापलेल्या जिल्ह्यात काही भागात झालेला पावसाचा शिडकावा आणि ढगाळ हवामान यामुळे वातावरण पूर्णत: बदलले आहे. ऐन उन्हाळ्यात पावसाळी वातावरणाची अनुभूती मिळत आहे. पावसाचे दाटलेले मळभ काढणीवर आलेला गहू, कांदा हरभरा आदी पिकांसाठी नुकसानकारक ठरू शकते. भाजीपाला आणि कांद्यावर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बळावली आहे. या स्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे पाच दिवस ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. ३१ मार्चला म्हणजे सोमवारी हंगामातील सर्वाधिक ३९.२ अंश तापमानाची नोंद झाली होती. महिनाभरापासून उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असताना सोमवारी वातावरणात बदल झाले. रात्री येवला तालुक्यातील काही भागात, मनमाडमध्ये पावसाचा शिडकावा झाला. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी कमालीचा उकाडा जाणवत होता. रणरणत्या उन्हाने आणि वाढत्या तापमानाने नागरिक अक्षरशः घामाघूम झाले होते. रात्री मनमाड परिसरात तासभर हलक्या सरी पडल्या. नाशिक शहरात पहाटे काही भागात शिडकावा झाला. अन्य काही भागात रिमझिम झाली.

मंगळवारी बहुतांश भागातील वातावरण बदलले. उकाडा कमी झाला. अनेक भागात सूर्यदर्शनही झाले नाही. दिवसभर पावसाचे मळभ दाटलेले होते. सध्या गहू, कांदा, हरभरा आदी पिके परिपक्व झाली आहेत. काही ठिकाणी काढणी प्रगतीपथावर आहे. अशावेळी पावसाची हजेरी नुकसान करणारी ठरेल, अशी शेतकरी वर्गात भीती आहे. द्राक्षांचा हंगाम संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. अत्यल्प क्षेत्रावरील द्राक्ष काढणी बाकी आहे. बदलत्या वातावरणाचा द्राक्षबागांवर तितका परिणाम होणार नसल्याचे सांगितले जाते.

काही भागात झालेल्या हलक्या शिडकाव्याने फारसे नुकसान होणार नाही. वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस वा गारपीटीत अधिक धोका असतो. साधारणत: एप्रिलमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होत असतो. त्यामुळे हे ढगाळ वातावरण भीतीदायक वाटणे स्वाभाविक आहे. ढगाळ वातावरणात कांदा, भाजीपाला पिकांना कीडरोगांचा प्रार्दुभाव होऊ शकतो. सध्या अनेक भागात काढण्या सुरू आहेत. पावसाने खळ्यात साठवलेला कांदा, गहू भिजण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागातील तज्ज्ञ सांगतात.

जिल्ह्यात ८५ ते ९० टक्के द्राक्षबागांची काढणी झाली आहे. काही प्रमाणात द्राक्ष बागांची काढणी शिल्लक आहे. सध्याच्या शिडकावा स्वरुपातील अवकाळीने फारसे नुकसान होण्याची शक्यता नाही.- विलास शिंदे (प्रमुख, सह्याद्री फार्म्स)