जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चार मार्च रोजी जळगाव जिल्हा दौर्यावर आले असून, त्यांच्या उपस्थितीत दुपारी मुंढोळदे (ता. मुक्ताईनगर) येथील तापी नदीवरील दोन तालुक्यांना पुलाच्या भूमिपूजनासह विविध कार्यक्रम होत आहेत. मात्र, त्यांच्या उपस्थितीत होणार्या कार्यक्रमांना मुक्ताईनगर तालुक्यातील बचत गटांतील महिलांना सक्ती केली जात असून उपस्थित न राहिल्यास ५० रुपये दंड केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंढोळदे (ता. मुक्ताईनगर) येथील कार्यक्रमास गर्दी जमविण्यासाठी स्थानिक नेत्यांकडून मुक्ताईनगर तालुक्यातील बचत गटांच्या महिलांना सक्ती केली जात असल्याची ध्वनिचित्रफीतही ॲड. खडसे यांनी प्रसारमाध्यमांतून प्रसारित केली आहे.
प्रदेशाध्यक्षा अॅड. खडसे- खेवलकर यांनी म्हटले आहे की, मुक्ताईनगर तालुक्यातील मुंढोळदे खडकाचे (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) येथे तापी नदीवरील पुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले जात आहे. या कार्यक्रमास गर्दी जमविण्यासाठी आमच्या मतदारसंघातील बचत गटांतील काही माताभगिनींनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत, ताई, तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे आणि न आल्यास तुम्हाला ५० रुपये दंड आकारू व तुम्हाला बचत गटातून काढण्यात येईल, असे ध्वनिफीतही माझ्यापर्यंत पाठवली असल्याचे अॅड. खडसे-खेवलकर यांनी नमूद केले. ज्यांनी अशी दमदाटी करण्याचा आणि ५० रुपये दंड आकारण्याचा, तसेच उपस्थितीबाबतची सक्ती केली जाते, अशांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर स्वतः संपर्क करून शहानिशा केली. त्यावेळी त्याबाबत समोरच्याने हो, आम्ही ५० रुपये दंड आकारला, अशी कबुलीही दिल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – मविआचे जागा वाटप, फक्त चार जागांवर… बाळासाहेब थोरात यांचा विश्वास
हेही वाचा – राहुल गांधी यांची न्याय यात्रा १२ मार्चला नंदुरबारमध्ये
बचत गटांत ज्या भगिनी काम करीत आहेत, त्यांची आज आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यांच्या हाताला काम नाही, म्हणून त्या बचत गटात काम करतात. कोणाची मुले, सासू-सासरे आजारी असू शकतात. कोणाला शेतात जायचे असेल आणि दिवसाची मजुरी पाडून कार्यक्रमाला जायचे नसेल, तर त्यांच्यावर जबरदस्ती कशासाठी करायची ? ज्यांना कार्यक्रमाला यायचे असेल आणि मनाने यायचे असेल, त्यांना कुणीही थांबवीत नाही. आम्ही विकासाच्या बाजूने आहोतच. मुक्ताईनगर तालुक्यात मुख्यमंत्र्यांचे स्वागतच आहे. मात्र, बचत गटांतील माता-भगिनींना त्रास देऊन, त्यांना जबरदस्तीने कार्यक्रमाला आलेच पाहिजे, ही भूमिका स्थानिक पदाधिकार्यांकडून घेतली जाते, ही बाब चुकीची आहे. बचत गटांतील माता-भगिनींना कुठल्याही गोष्टींमध्ये जबरदस्ती करून त्यांच्यावर दबाव आणून त्यांना कार्यक्रमास सक्ती करणे हे चुकीचे आहे, याकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः लक्ष घालावे, असेही अॅड. खडसे-खेवलकर यांनी नमूद केले.