धुळे – मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरून संतप्त जमावाने पाच भिक्षुकांची हत्या केल्याप्रकरणी सात जणांना येथील प्रथमवर्ग अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी जन्मठेप सुनावली. सहा वर्षांपूर्वी साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे घडलेल्या या हत्याकांडाने खळबळ उडाली होती.
राईनपाडा येथे एक जुलै २०१८ रोजी काही जण भिक्षुकीसाठी आले असता मुले चोरणारी टोळी आल्याच्या संशयावरून गाव आणि परिसरातील संतप्त जमावाने त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात बंदिस्त केले. त्यानंतर त्यांच्यावर दगड, विटांचा मारा केल्याने दादाराव भोसले, राजू भोसले, भारत भोसले, भारत माळवे आणि अग्नू इंगोले (सर्व रा. मंगळवेढा, सोलापूर) यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. ग्रामपंचायत कार्यालयातच घडलेल्या या घटनेने जिल्हा प्रशासनासह सारेच हादरले होते.
याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे तत्कालीन उपनिरीक्षक रवींद्र रणधीर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हल्लेखोरांपैकी २७ जणांना पोलिसांनी अटक केली होती. पैकी राजाराम गावित यांचा मृत्यू झाला. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी ९१७ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने या खटल्यात ३५ साक्षीदार तपासले, पैकी पाच स्थानिक साक्षीदार फितूर झाले.
धुळे येथील प्रथमवर्ग अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एफ.ए.एम. ख्वाजा यांनी सोमवारी या खटल्याचा निकाल दिला. महारु पवार, हिरालाल गवळी (दोन्ही रा.सावरपाडा, साक्री), गुलाब पाडवी (रा.चौपाळे, साक्री), युवराज चौरे (रा.देवळीपाडा, साक्री), दशरथ पिंपळसे, मोतीलाल साबळे, कालू गावित (सर्व रा.राईनपाडा, साक्री) यांना जन्मठेप ठोठावण्यात आली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे उज्वल निकम यांनी युक्तिवाद केला. त्यांना जिल्हा सरकारी अभियोक्ता देवेंद्रसिंह तवर यांच्यासह गणेश पाटील व अन्य वकिलांनी सहकार्य केले.