जरा कुठं पाऊस गायब झाला काय अन् लगेच दुष्काळ.. दुष्काळ अशी ग्रामीण भागात ओरड सुरू झाली (बुधवारी तो परतही आला.). म्हणे पिण्यासाठी पाणीच नाही.. जनावरांना चारा नाही.. हातांना काम नाही. शेतीत काही पिकलेच नाही तर कर्ज फेडणार कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येऊ लागला. टंचाई आणि दुष्काळाच्या भीतीने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांमध्ये वाढ होत असताना सिंहस्थानिमित्त वसलेल्या साधुग्राममध्ये जरा डोकावून पाहा! भजन आणि भोजनात मग्न साधू, महंतांना कुठे आहे दुष्काळाची फिकीर? सर्वत्र कसा आनंदी-आनंद. अन्नछत्रांमध्ये दररोज सुग्रास भोजनांच्या पंगती उठत आहेत. टंचाई, दुष्काळ हे शब्द तर या ठिकाणी नावालाही नाहीत. कोणी जर त्यासंदर्भात विचारणा केलीच तर कुठे आहे दुष्काळ, असा प्रश्न कानी पडल्यास नवल नको.
सुमारे दीड महिन्यापासून जिल्ह्य़ातून पाऊस गायब झाला. बुधवारी त्याने पुन्हा काहीसे दर्शन दिले असले तरी ते उसने अवसान आणल्यागतच. त्यामुळे शेतकरी हादरला आहे. रब्बीमध्ये अवकाळीने झालेले नुकसान खरीपात भरून निघेल, ही आशाही आता फोल ठरण्याच्या भीतीने तो अक्षरश: गलितगात्र झाला आहे. या नैसर्गिक संकटात प्रशासनाकडून आपणास दिलासा मिळत नसल्याचे त्याचे गाऱ्हाणे. नांदगाव, सटाणा, देवळा, मालेगाव या चार तालुक्यांमध्ये टंचाईची तीव्रता सर्वाधिक. या चार तालुक्यांमधील कोणत्याही एका गावाचे प्रातिनिधिक म्हणून उदाहरण घेतल्यास परिस्थितीची भीषणता लक्षात येईल. पिकांची आशा तर आता बहुतेकांनी सोडलीच आहे, परंतु पिण्यासाठी पाणी मिळणेही मुश्कील झाल्याने शेतकरी अधिक हतबल झाला आहे. हातपंपांमधून थेंबही पडेनासा झाला आहे.
काही गावांची तहान टँकरने भागविण्याचा प्रयत्न होत असला तरी, बऱ्याच गावांचा घसा अजूनही कोरडाच आहे. पिकणारच नाही तर कर्जफेड कशी करणार, हा शेतकऱ्यांपुढील यक्षप्रश्न. कितीही चाचपडले तरी या प्रश्नाचे उत्तर मिळणे अवघडच.
जिल्ह्य़ाचा ग्रामीण भाग टंचाई आणि दुष्काळाने ग्रस्त असताना दुसरीकडे साधुग्राममध्ये त्याची यत्किंचितही छाया नाही. देशाच्या विविध भागांतून मानवजातीच्या कल्याणासाठी येथे जमलेल्या साधू, महंतांचे कसे अगदी मस्त चाललेय. प्रवचन, भजन आणि भोजन यामध्ये सर्वच मग्न. त्यातही अगदीच कंटाळा आला तर, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून मनोरंजन करून घ्यायचे. शाही मार्गावरून परवानगीशिवाय मिरवणूक काढल्याचे निमित्त करून भररस्त्यात महिला आणि लहान मुलांसमोर दंडुके, तलवारी परजत मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिकही ते कधी कधी करून दाखवितात. अर्थात, हे सर्व काही जनतेच्या कल्याणासाठी. दुष्काळी परिस्थितीने पिचलेल्यांचे लक्ष काही वेळ का होईना दुसरीकडे वळावे हा त्यामागील हेतू. किती ही कळकळ.
प्रशासनालाही दुष्काळी परिस्थितीने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा अगदी क्षुल्लक क्षुल्लक कारणांसाठी आकांडतांडव करणाऱ्या साधू, महंतांची चिंता अधिक. त्यांनी डरकाळी फोडण्याचा अवकाश की सत्ताधाऱ्यांसह प्रशासन लोटांगण घालण्यास तयार. खरे तर, अशा वेळी लोटांगण घालण्यापेक्षा शेतकरी किंवा जिल्ह्य़ातील दुष्काळी परिस्थितीविषयी अद्याप चकार शब्दही न काढणाऱ्या साधू, महंतांना जाणीव करून देण्याची भूमिका प्रशासनाने पार पाडावयास हवी. परंतु, तसे काहीही झालेले नाही. साधुग्राममधील परिस्थिती पाहून कदाचित प्रशासनही म्हणेल, कुठे आहे दुष्काळ?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा