नाशिक : सापडलेला भ्रमणध्वनी परत देण्यासाठी गेलेल्या युवकाला संबंधित महिलेच्या कुटूंबियांनी सळईने मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखम झाल्याने युवकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार अंबड परिसरात घडला. या प्रकरणी चार संशयितांविरूध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नितीन जाधव हा शहरातील पाथर्डी परिसरात हॉटेलमध्ये कार्यरत होता. सात एप्रिल रोजी कामावरून परत जात असतांना त्याला भ्रमणध्वनी सापडला. दुसऱ्या दिवशी त्या भ्रमणध्वनीवर पल्लवी ठोके यांनी संपर्क साधला. हा भ्रमणध्वनी आपल्या पतीचा असून तो परत करा, अशी विनंती केली. त्यानुसार नितीन हा त्रिमूर्ती चौक परिसरात भ्रमणध्वनी परत करण्यासाठी गेला असता तेथे एक महिला, तिचा पती, सोबत अन्य दोन अनोळखी व्यक्ती होत्या. त्यातील एकाने भ्रमणध्वनीवरून पत्नी पल्लवी हिच्याशी का संपर्क साधतो, असे दरडावत सळईने मारहाण केली. हा हल्ला झाल्यानंतर नितीन यास सरकारी रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान नितीनची दुचाकी, भ्रमणध्वनी कोणीतरी लंपास केला.

हेही वाचा… धुळे : बनावट बियाणांची विक्री थांबविण्यासाठी पाच भरारी पथके

हेही वाचा… मालेगावात सहा हरणांचे मांस जप्त

गणपत जाधव यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नितीन यास पल्लवी ठोके, तिचा पती नीलेश ठोके, त्याचा सहकारी प्रसाद मुळे आणि अन्य एकाने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जिल्हा रुग्णालयात एमआरआय व्यवस्था नसल्याने नितीनला डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतांना रविवारी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी अंबड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सूरज बिजली यांनी संशयित पल्लवी या फरार असून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: While returning lost mobile man beaten to death asj