अनिकेत साठे, लोकसत्ता
नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या संकल्पनेतून गोदावरी गौरवची मुहूर्तमेढ रोवली गेली. वेगवेगळ्या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या बड्या व्यक्तींचा गौरव करायला हवा, यानिमित्ताने संबंधित व्यक्ती नाशिक नगरीत यावी आणि नाशिककरांनी त्यांना कृतज्ञतेचा नमस्कार करावा, या कल्पनेतून सुरू झालेल्या गोदावरी गौरव पुरस्काराने आजवर अनेकांना गौरविण्यात आले आहे. एका वर्षी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची निवड करण्यात आली. परंतु, पुरस्कार स्वीकारण्यास त्यांना प्रत्यक्ष नाशिकला येणे शक्य नव्हते. त्यामुळे पुढील वेळी म्हणजे दोन वर्षानंतर त्यांना गौरविण्यात आले. पहिल्यांदा निवड झाली, तेव्हाच डॉ. माशेलकरांनी दोन वर्षापुढील पुरस्कार वितरणाची तारीख आपल्या वहीत नोंदवून घेतली होती.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या गोदावरी गौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी ॲड. विलास लोणारी यांनी ही आठवण कथन केली. प्रतिष्ठानतर्फे १९९२ पासून दर दोन वर्षांनी गोदावरी गौरव पुरस्कार दिले जातात. यंदाचा हा १७ वा पुरस्कार आहे. कुसुमाग्रजांच्या स्मृतीदिनी १० मार्च रोजी त्याचे वितरण केले जाते. पुरस्कार्थींची निवड प्रतिष्ठानचे विश्वस्त मंडळ करते. ज्या कुणाचा या पुरस्काराने गौरव केला जाणार आहे, त्या व्यक्तीने स्वत: उपस्थित राहावयास हवे, ही अट आहे. या अटीमुळे डॉ. माशेलकर यांना दोन वर्ष प्रतिक्षा करावी लागली. या पुरस्कारामागील तात्यासाहेब तथा वि. वा. शिरवाडकर यांची भावना ॲड. लोणारी यांनी नमूद केली. केवळ साहित्यच नव्हे तर, वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याचा विचार झाला. हा पुरस्कार नसून संबंधित व्यक्तीने केलेल्या कामाचा गौरव करणे अनुस्युत आहे. मोठी कामे करणारी माणसे नाशिकला यायला हवीत आणि शहरातील लोकांनी त्यांना कृतज्ञतेचा नमस्कार करावा, या भावनेतून सुरू झालेल्या गोदावरी गौरवच्या निवड प्रक्रियेत पुरस्कार्थींची प्रत्यक्ष उपस्थिती ही अट प्रारंभापासून ठेवली गेली.
एकदा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा गौरव करण्याचे निश्चित झाले. त्या अनुषंगाने प्रतिष्ठानने त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा डॉ. माशेलकर यांची १० मार्च रोजीची स्वित्झर्लंड येथील आंतरराष्ट्रीय बैठक आधीच निश्चित झाली होती. त्यांनी दिल्लीत येऊन पुरस्कार वितरण करण्यास सुचवले. परंतु, प्रतिष्ठानकडून गोदावरी गौरवसाठी प्रत्यक्ष नाशिक येथे उपस्थित राहण्याचा नियम सांगितला गेला. यावर डॉ. माशेलकर यांनी पुढील वेळी हा पुरस्कार द्यावा, त्या सोहळ्याची तारीख आजच लिहून ठेवतो, असे म्हटले होते. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे विज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल २००४ मध्ये डॉ. रघुनाथ माशेलकर यांना गौरविण्यात आले. कुसुमाग्रजांच्या संस्थेत गौरव होतो ही बाब सर्वांसाठी आनंदाची असते, याकडे ॲड. लोणारी यांनी लक्ष वेधले. गोदावरी गौरवने आजवर वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मोठ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले आहे. या गौरवासाठी भाषा. प्रांत, विषय वा क्षेत्राची मर्यादा ठेवली गेली नाही. याचे दाखले यावेळी देण्यात आले.
पुरस्कार रकमेत वाढ अशक्य
प्रारंभी गोदावरी गौरव पुरस्कारासाठी ११ हजार रुपये रक्कम होती. लोकांच्या मागणीनुसार ती २१ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. या सोहळ्याचा एकूण खर्च सात लाखांच्या आसपास आहे. पुरस्कार्थींची निवास, येणे-जाणे व्यवस्था आदींसाठी बराच खर्च होतो. त्यामुळे ही रक्कम वाढविणे अशक्य असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पुरस्कार्थींचे काम खूप मोठे आहे. पुरस्काराची रक्कम हे केवळ एक टोकन असल्याचे सूचित करण्यात आले.