नाशिक – लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक यंत्रणा समाज माध्यम प्रभावकांची (सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर) मदत घेणार आहे. डिजिटल माध्यमातील या व्यक्तिमत्वांच्या प्रभावाचा उपयोग मतदान जागृतीसाठी करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्हा निवडणूक कार्यालयाने मतदान जनजागृतीच्या अनुषंंगाने समाज माध्यम प्रभावकांची बैठक बोलावली होती. नियोजन समिती सभागृहात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्व प्रकारच्या माध्यमकर्मींनी योगदान द्यावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी केले.

हेही वाचा – विखे-पाटील यांच्या माफीनाम्यानंतरही भाजपमधील निष्ठावंतांची नाराजी कायम

सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरीत ६५.७१ तर नाशिक लोकसभा मतदारसंघात ५९.५३ टक्के मतदान झाले होते. मतदारांमधील मतदानाबाबतची नकारात्मकता दूर करून, त्यांच्या मानसिकतेत, विचारसरणीत बदल होण्याची गरज आहे. नवमतदार, पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नवयुवकांप्रती मतदानाच्या कर्तव्याबद्दल जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी समाज माध्यम प्रभावी साधन आहे. संविधानाने कुठलाही अडसर न ठेवता प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या माध्यमकर्मींनी याबाबत सकारात्मक भूमिका घेत अधिकाधिक जनजागृती करावी. येत्या २० मे हा दिवस प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी राखून ठेवावा, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा – बच्‍चू कडू यांच्या खेळीने महायुतीसाठी डोकेदुखी वाढणार ?

मतदानाच्या दिवशी मतदारांसाठी मतदान केंद्रावर पाणी, शेड, पाळणाघर, अपंग मतदारांसाठी सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात जवळपास ४६ लाख ८६ हजार मतदार नोंदले आहेत. यामध्ये प्रतिहजारी महिलांची नोंदणी उल्लेखनीय आहे. मतदार नोंदणीप्रमाणेच मतदानाचा टक्का वाढवणे गरजेचे असून त्यामुळे लोकशाहीचा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा होणार असल्याचे डॉ. मंगरुळे यांनी सांगितले.

हेही वाचा – मुलाच्या ‘कल्याणा’साठी मुख्यमंत्र्यांचे सारे काही

जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्याने मतदानाचा आदर्श निर्माण करावा, यासाठी माध्यमकर्मींकडून सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले. त्यासाठी कोणत्या माध्यमातून प्रयत्न करता येतील, याकडे त्यांनी लक्ष वेधले. समाज माध्यम समन्वयक पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी समाज माध्यमातील माध्यमकर्मींनी नेमकी काय कार्यवाही करावी, याबाबत माहिती दिली. तर निवडणूक कार्यालयाने मतदारांना आवश्यक असलेल्या संपर्क क्रमांकांसारख्या काही माहिती दिल्यास ती समाज माध्यमाद्वारे प्रसारित करून करता येईल. प्रभावकांकडून ती त्यांच्या अनुयायांपर्यंत २४ तासात पोहोचू शकते, असे समाज माध्यम प्रभावक रमेश पाटील यांनी सांगितले. यावेळी नायब तहसीलदार राजेश अहिरे, निवडणूक शाखेच्या प्रज्ञा कुलकर्णी, मुद्रित, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी व समाज माध्यम प्रभावक उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is the help of social media influencers being taken to increase voter turnout ssb