जळगाव – रेल्वेंमधील प्रवास वेगवेगळ्या कारणांमुळे वादग्रस्त ठरत असतो. रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना मिळणारी वागणूकही कधीकधी चर्चेत असते. राज्यात विक्रीवर बंदी असतानाही परराज्यातून चोरट्या मार्गाने आलेला गुटखा आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांची बिनबोभाटपणे होणारी विक्री यामुळे रेल्वे गाड्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. विशेषतः लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये हे घातक पदार्थ सर्रास विकले जात असल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

प्रवाशांच्या आरोग्याचा विचार करून रेल्वे प्रशासनाने फलाट आणि आतील दालनांमध्ये गुटखा किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र, हे सर्व साहित्य लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये सहज उपलब्ध असते. कोणाचाही धाक न बाळगता एका गाडीत चार ते पाच किंवा त्यापेक्षा जास्त विक्रेते फिरताना दिसून येतात. परिणामी, सर्व डब्यांमध्ये सिगारेट, तंबाखू आणि गुटखा सतत उपलब्ध असतो. त्यांच्या सेवनामुळे डब्यामधील प्रवाशांना विनाकारण त्रास होतो. दिवसा गाड्यांमध्ये रेल्वे पोलीस दल (आरपीएफ) आणि भारतीय रेल्वे पोलीस (जीआरपी) कर्मचाऱ्यांची गस्त सहसा नसते. त्याचा पुरेपूर फायदा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे घेतात. या काळात, एका रेल्वे गाडीमध्ये एकच तिकीट तपासणीस असतो. त्यांच्याकडून बेकायदेशीर गुटखा किंवा इतर साहित्य विकताना कोणी आढळल्यास दंड आकारण्याची तरतूद आहे. प्रत्यक्षात संबंधितांवर कोणतीच कारवाई होत नाही.

तंबाखूजन्य व इतर खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांमुळे रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. कचरा वेळेवर उचलला न गेल्यास डब्यांमध्ये प्रसंगी दुर्गंधी पसरते. प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येते. रेल्वे प्रशासनाने नियमित गस्त घालून अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करावी. तसेच, तिकीट तपासणीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाकडे लक्ष देऊन बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी अपेक्षा प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.

तिकीट परीक्षकाचे युवतीशी गैरवर्तन

काही रेल्वे कर्मचाऱ्यांकडूनही प्रवाशांना त्रास दिला जात असल्याचे प्रकार घडत आहेत. नुकताच धावत्या प्रवासी गाडीत तिकीट परीक्षकाने तरुणीशी गैरवर्तन केल्याने मनमाड येथील रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गोरखपूर – बंगळुरू विशेष प्रवासी रेल्वे गाडीतून कानपूरहून पुण्याला जाण्यासाठी युवती प्रवास करत होती. युवतीकडील तिकीट हे आरएसी असल्याने तिने तिवारी नामक तिकीट परीक्षकाकडे जागा उपलब्धतेविषयी विचारणा केली. तिवारीने प्रारंभी गाडीतील बी-४ डब्यात बसण्यास सांगितले. नंतर ए-१ डब्यातील ०५ नंबरचे आसन दिले. नंतर तिवारी युवतीजवळ येऊन बसला. काही वेळाने त्याने युवतीला अयोग्य प्रकारे स्पर्श केला. चुकून झाल्याचे समजून तिने दुर्लक्ष केले. तिवारीने पुन्हा तसाच स्पर्श केल्यावर युवती भीतीने स्वस्छतागृहात जाऊन २० ते २५ मिनिटे बसून राहिली. त्यानंतर तिवारी बाहेर उभा असलेला दिसल्याने युवतीने तिच्या वडिलांना भ्रमणध्वनी करुन सर्व प्रकार सांगितला. भुसावळ रेल्वे स्थानक येईपर्यंत तिवारी युवतीचा पाठलाग करत होता. अखेर युवतीने मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.