जळगाव – गुन्हेगारी कृत्यांमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या भुसावळमध्ये मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास दुहेरी खुनाची घटना उघड झाली. शहरातील वांजोळा रोड भागात रेल्वे विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचार्याने पत्नीसह आईची हत्या केली असून, त्याचा शालक या घटनेत गंभीर जखमी झाला आहे.
वांजोळा रोडवरील शगुन इस्टेट भागातील रहिवासी हेमंत भूषण हा रेल्वेत नोकरीला आहे. मध्यरात्री त्याचा आई आणि पत्नी यांच्याशी कौटुंबिक वाद झाला. पहाटे त्याने संतापाच्या भरात आई सुशीलादेवी (६०) आणि पत्नी आराध्या (२४) यांना लोखंडी तव्याने मारहाण केली. त्यात अतिरक्तस्त्राव होऊन दोघींचा मृत्यू झाला. दाम्पत्यांमध्ये या ना त्या कारणातून नेहमीच वाद होत होता.
त्यांच्यातील वाद मिटविण्यासाठी मुंबईतील उच्चशिक्षित सॉफ्टवेअर अभियंता तथा हेमंतचा शालक ऋषभ हा सोमवारी भुसावळमध्ये आला होता. ऋषभ यानेही मध्यस्थी केली. मात्र, त्याच्यावरही प्राणघातक हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हेमंत भूषण याचा पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. ऋषभने हा प्रकार बाजारपेठ पोलीस ठाण्यात कळविल्यनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड, सहायक निरीक्षक मंगेश गोंटला, हरीश भोये यांनी धाव घेत पाहणी केली