लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : मखमलाबाद, मातोरी परिसरातील सुळा डोंगराच्या पायथ्याला सोमवारी रात्री वन विभाग परिसरालगत वणवा भडकला. माहिती मिळताच परिसरातील पर्यावरणमित्र आणि स्थानिक शेतकऱ्यांनी धाव घेत दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर नियंत्रण मिळविले.
दरवर्षी परिसरात वणवा लागत असतात. यात पर्यावरणाची अतोनात हानी होत आहे. सुळा डोंगराच्या पायथ्याशी वनक्षेत्राजवळ वणवा लागल्याची माहिती मातोरीचे पोलीस पाटील रमेश पिंगळे आणि व्याख्याते समाधान हेगडे पाटील यांनी दिली, त्यानंतर दुर्ग अभ्यासक राम खुर्दळ यांनी टोल फ्री तसेच वन विभागाच्या १९२६ या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. भारत पिंगळे, शिवाजी धोंडगे आणि मातोरी शिवारातील स्थानिक शेतकऱ्यांनी, युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. अंधारात वणव्यावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. दोन तासांनी वणवा विझविण्यात यश मिळाले. दरवर्षी असे प्रकार घडतात. स्थानिक वन समित्या, वन पर्यावरण विभागाला कुठलेही सोयरसुतक नसते. वणवा लावणारे मोकाट राहतात. त्यामुळे असे प्रकार घडत असल्याची तक्रार धोंडगे यांनी केली.
आणखी वाचा-नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
अनेक वर्षापासून दरीमाता वृक्षमित्र, शिवकार्य गडकोट संस्था, राह फाउंडेशन, वृक्षवल्ली फाउंडेशन, गिव्ह फाउंडेशन, बेळगाव ढगा येथील दत्तू ढगे, वन विभागाचे वनपाल अशोक काळे हे वणवा विझवण्यासाठी झटतात, मात्र वन पर्यावरण खाते याबद्दल अनभिज्ञ असते. त्यांच्याकडून कुठलाही संवाद साधला जात नसल्याची पर्यावरणप्रेमींची तक्रार आहे. गाव खेड्यात वन समित्या प्रशिक्षित नसल्याने वणवा विझवताना अनेकदा अपघात घडतात. यावर प्रशासन व लोकप्रतिनिधी अजूनही गंभीर नसल्याची स्थिती आहे, नैसर्गिक संकट असलेल्या वणव्याला रोखण्यासाठी कृती दलाने दिलेल्या उपाय योजनांची अंमलबजावणी होत नसल्याकडे दुर्ग अभ्यासक राम खुर्दळ यांनी लक्ष वेधले.