लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: शहरापासून जवळच असलेल्या गंगापूर, गिरणारे परिसरातील खासगी जागेत वणवा पेटल्याची घटना होऊन २४ तासही उलटत नाही तोच हरसूल घाटातील माथ्यावर मंगळवारी वणवा पेटला. थेट जातेगाव शिवारापर्यंत डोंगर जळत असतांना रस्त्याने जाणाऱ्या वृक्षमित्रांनी आणि काही स्थानिकांनी जीव धोक्यात घालून वणवा विझवला. वयस्कर शेतकरी शंकर महाले यांनीही वणवा विझवून आपले शेत वाचविले. वणव्यात वन्यजीव, दुर्मिळ झाडे बेचिराख झाल्याचे वृक्षमित्रांनी सांगितले.
जिल्ह्यात सातत्याने वणवे लागत असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. रामशेज गडावर दोनदा, सुळा डोंगर, मायना, रोहिला-कोणे डोंगर रांगा, वणी रोडवरील वनक्षेत्र, गिरणारे-धोंडेगाव या ठिकाणी एकेकदा वणवा लागला आहे. मंगळवारी हरसूल घाटातील हजारो हेक्टर क्षेत्रात वणवा लागला. हरसूल घाट आधीच अवैध वृक्षतोडीमुळे ओसाड होत असतांना मंगळवारी लागलेल्या वणव्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र जळून खाक झाले. जंगलात वणवा पसरत असताना पर्यावरणविषयक कामकाजासाठी जाणारे वृक्षमित्र तुषार पिंगळे,शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ, राह फाउंडेशनच्या गोदावरी देवकाते, सर्पमित्र प्रल्हाद पवार, वृक्षमित्र अनिल बेंडकोळी आदींनी वणवा विझविण्यासाठी प्रयत्न केले.
आणखी वाचा- नाशिक: पाणी नियोजनासाठी अनोखी शक्कल, विहीरीचा वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रकार
यावेळी ८० वर्षाचे शेतकरी शंकर बाबा महाले यांनी जीवावर उदार होऊन या घनदाट जंगलातील धगधगता वणवा विझविण्यासाठी पुढाकार घेतला. वणवा विझवितांना शंकरबाबांना रडू आले. पर्यावरणप्रेमी राम खुर्दळ यांना त्यांनी तुमच्यामुळेच माझं शेत, गवत. गुरे वाचल्याचे सांगितले. त्यांचे सांत्वन करून पर्यावरणप्रेमी घाटातील डोंगराला वळसा घालून पुढे परत वणवा विझविण्याच्या कामास लागले.
वणव्याच्या वाढत्या घटनांनी आम्ही निसर्ग, पर्यावरणमित्र हैराण आहोत. दरवर्षीप्रमाणे यंदाही घाट माथ्यावर वणव्याचा कहर आहे, वणवा लावणारे मोकाट का, हा प्रश्न आम्हाला खटकतो, वनक्षेत्र दिवसागणिक नष्ट होत आहे, याची चिंता अजूनही सरकार, प्रशासन, समाज, वनव्यवस्थापन समित्यांना नाही. हे दुर्दैवच म्हणावे लागेल. -राम खुर्दळ (पर्यावरण,दुर्गप्रेमी)