लोकसत्ता वार्ताहर

नंदुरबार – लोकसभा निवडणूक जाहीर झाली असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शिंदे गटाकडून पुन्हा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी हे १७ मार्च रोजी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. विधान परिषदेसाठी २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत नाट्यमय घडोमोडीनंतर सर्वांच्या चर्चेचे विषय राहिलेले आणि स्वत: उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलेले आमदार पाडवी हे शिंदे गटाला जवळ करणार असल्याने ठाकरे गटाला हा एक धक्का आहे. पाडवी आणि सचिन अहिर यांची विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर शिवसेनेला खिंडार पडले होते. निकाल जाहीर होताच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदार सुरत आणि नंतर गुवाहाटीकडे रवाना झाले होते. आमश्या पाडवी यांनी मात्र उद्धव ठाकरेंबरोबर राहाणे पसंत केले होते.

विधान परिषदेत आदिवासींच्या प्रश्नावर धारदारपणे वक्तव्य करणारे पाडवी यांची अनेक वेळा ठाकरे यांनी आमचा ठाण्या वाघ म्हणून प्रशंसा केली आहे. नंदुरबारमध्ये चंद्रकांत रघुवंशी यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर पाडवी यांनी ठाकरे गटाला ताकद देण्याचे काम केले. पाडवी यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांना चांगली टक्कर दिली होती. अवघ्या १२०० मतांनी ते पराभूत झाले होते. त्यामुळे पाडवी यांना ताकद देण्यासाठी शिवसेनेने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली होती. दिवाकर रावते आणि सुभाष देसाई यांसारख्या आमदारांच्या निवृत्तीनंतर पाडवींना मिळालेली संधी हे शिवसेनेचे मोठे धक्कातंत्र मानले गेले.

आणखी वाचा- जळगावात पीक विमाप्रश्‍नी ठाकरे गटाचे अनोखे आंदोलन

शनिवारी जिल्ह्यात अचानक आमश्या पाडवी यांच्या पक्ष बदलाच्या चर्चांनी जोर धरला आणि सर्वांना धक्का बसला. ते रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्या येते. याबाबत पाडवी यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क होऊ शकला नाही. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश पराडके यांनी, अशी कुठलीही माहिती आपल्यापर्यंत आली नसल्याचे सांगितले. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनीही याबाबत काहीही सांगता येणार नसून पक्ष प्रवेश झाल्यास बोलू, असे नमूद केले.

Story img Loader