जळगाव – पूज्य साने गुरुजींच्या कर्मभूमीत अमळनेर साहित्यनगरीत ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यास अखिल भारतीय साहित्य मंडळाने मान्यता दिली. संमेलनासाठी आतापासूनच तयारी सुरू केली असून, संमेलनासाठी प्रताप महाविद्यालयाचे स्थळ निश्‍चित झाले आहे. भोजनव्यवस्थेत पंचपक्वान्न न ठेवता खानदेशी अन्नपदार्थ असेल, अशी माहिती मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमळनेर येथील नांदेडकर सभागृहात डॉ. जोशी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. डॉ. जोशी म्हणाले की, मोठ्या अडथळ्यांवर मात करून आणि स्पर्धक शहरांना मागे टाकून अमळनेरला आगामी साहित्य संमेलन घेण्याची जबाबदारी मिळाली आहे. हा अमळनेरकरांसाठी अभिमानाचा क्षण आहे. १९५१ नंतर पुन्हा अमळनेरमध्ये हे संमेलन होतेय. यासाठी आमचे खूप प्रयत्न सुरू होते. सातारा आपल्या स्पर्धेत होते. मात्र, स्थळ पाहणी समितीला अमळनेरचे नियोजन योग्य वाटल्याने त्यांनी आपली बाजू लावून धरली होती. अखेर महामंडळाने अमळनेरला आयोजनाची जबाबदारी दिली. नियोजनात संमेलनाचे तीन केंद्रे असतील. त्यात प्रामुख्याने संमेलनस्थळ, निवासव्यवस्था व स्वच्छतागृह, दळणवळण विचारात घेतले आहे. अमळनेरमध्ये सर्व हॉटेल मिळून १०० खोल्या उपलब्ध असतील. तसेच सर्व मंगल कार्यालये मिळून १५०० ते २५०० जणांची सोय होऊ शकते. काही व्यवस्था धुळे येथे करण्याचे नियोजन आहे. खानदेशी बोलीभाषा आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्यावर आधारीत संकल्पना संमेलनात असेल.
साहित्य संमेलनामुळे अमळनेर व खानदेशचे साहित्य उदात्तीकरण तर होईल. मात्र, अमळनेरची व्यावसायिक वृद्धी व्हावी हादेखील उद्देश आहे. याशिवाय प्रताप महाविद्यालयाचे स्थळ निश्‍चित झाले आहे. संमेलनाचा खर्च आणि स्वरूप मोठे असल्याने खानदेशातील तिन्ही जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी आणि विविध शैक्षणिक संस्थांचे सहकार्य घेतले जाईल. बाहेरगावी गेलेल्या उच्चपदस्थांना यात सहभागी करणार असून, जास्तीत जास्त तरुणांचा सहभाग असेल, असेही डॉ. जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा – सुरळीत वीज पुरवठ्यासाठी धुळ्यात ठाकरे गटाचे आंदोलन

शासनाकडून ५० लाखांचा निधी

संमेलनासाठी खर्च खूप मोठा असून, शासनाकडून ५० लाखांच्या निधीची तरतूद असली, तरी दोन कोटींपर्यंत निधी मिळविण्याचा प्रयत्न आहे. स्थानिक आमदार व खासदारांच्या निधीतून काही रक्कम मिळू शकेल. तसेच तिन्ही जिल्ह्यांतील संस्था, उद्योजकांसह काही लहान दात्यांकडून यथाशक्ती मदत घेऊन दोन ते अडीच कोटी निधी जमा होऊ शकतो. निधी घेताना प्रत्येकाला पावती दिली जाईल. याकामी स्थानिक प्रशासनास सहभागी करणार असून, प्रताप महाविद्यालयानेही मोठी जबाबदारी घेण्याची तयारी दर्शविली आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत अंतिम नियोजन केले जाईल, अशी माहिती डॉ. जोशी यांनी दिली.

हेही वाचा – नाशिक: बड्या थकबाकीदारांकडील वसुलीत राजकीय अडथळे; जिल्हा बँक कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

साने गुरुजींच्या पुतळ्याजवळ आनंदोत्सव

सर्वांनी पूज्य साने गुरुजींच्या पुतळ्यास अभिवादन व माल्यार्पण करीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारी सदस्य डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, भय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्‍वरी, प्रा. श्याम पवार, प्रा. शीला पाटील, शिवाजीराव पाटील यांच्यासह खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, संचालक नीरज अग्रवाल, पालिकेचे संजय चौधरी, दिनेश नाईक, संभाजी पाटील, राजू फाफोरेकर, निवृत्त पोलीस निरीक्षक कंखरे, हेमंत भांडारकर, रामकृष्ण पाटील आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will seek the cooperation of organizations in khandesh for the marathi sahitya samela says avinash joshi ssb