जळगाव – जिल्हा दूध उत्पादक संघाचा विकास, तसेच शेतकऱ्यांच्या हितार्थ शासनाच्या मदतीने प्रयत्नशील राहणार आहे. आता जे काही दुधाचे भाव कमी झाले आहेत, त्यासंदर्भात आठ-दहा दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दुधाच्या दराचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री अनिल पाटील यांनी दिली.
शहरातील शिवाजीनगर भागातील जिल्हा दूध उत्पादक संघाची मासिक सभा झाली. त्यानंतर मंत्री पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दूध संघात आधी विरोधक होतो, आता सत्तेत आहे. दूध संघाच्या बैठकीला येणे अनिवार्य होते. विरोधक असताना खऱ्या अर्थाने विरोधाची भूमिका पार पाडली. आता सत्तेत आहोत. त्यामुळे या हक्काच्या दूध संघाला विकासाच्या दृष्टिकोनातून आणि शेतकऱ्यांच्या हितार्थ काय काय करता येईल, याबाबत चर्चा सुरू आहे. तसेच सध्या दूधाचे भाव कमी झाले आहेत, त्यासंदर्भात शासनाचाही सहभाग घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी यांचे निधन, शरद पवारांकडून श्रद्धांजली
जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना पवार साहेब असेही कमी महत्त्व देत होते. ज्या ठिकाणी महत्त्व द्यायचे असते, ते तिकडे जातील. पवार साहेब हे घरात राहणारे नेते नाहीत, ते देशासह महाराष्ट्रभरात फिरू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हेसुद्धा काही दिवसांनंतर दौऱ्यावर निघणार आहेत. पक्षवाढीसाठी प्रयत्न केले जात असतात. पवारसाहेब कशासाठी जात आहेत, याची मला कल्पना नाही, असेही मंत्री अनिल पाटील म्हणाले.
हेही वाचा – शरद पवार यांनी येवल्यापासून सुरुवात केल्याचा आनंद – छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
त्या विद्यार्थ्यांशी संबंध नाही – मंत्री अनिल पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते अमळनेर येथे रवाना झाले. त्यावेळी स्वागतासाठी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना रस्त्यावर उभे करण्यात आले होते. विद्यार्थ्यांकडून मंत्र्यांना मानवंदनाही देण्यात आली. यामुळे पाटील यांच्यावर टीका केली जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना या विद्यार्थ्यांशी माझा कुठलाही संबंध नाही. ते विद्यार्थी उत्सुकता किंवा प्रेमापोटी मला पाहण्यासाठी रस्त्यावर आले असावेत, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थी रस्त्यावर उभे असल्याची मला कुठलीही माहिती नाही. मी कार्यकर्त्यांच्या गराड्यातून जात होतो. त्यामुळे अशा कुठल्याही शाळेशी माझे बोलणे झाले नाही किंवा भेट झालेली नाही. अनेक आश्रमशाळांमध्ये मी अनेकदा भेटी दिल्या आहेत, तसेच तेथील विद्यार्थ्यांना मदतकार्यही केले आहे. मी आज जरी मंत्री झालो असलो, तरी आजवर तळागाळातला कार्यकर्ता म्हणूनच काम केले आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे, त्यांच्यासोबत अशा प्रकारची वागणूक देणे मला योग्य वाटणार नाही, असे त्यांनी नमूद केले.