लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : एरवी डिसेंबर, जानेवारीत हुडहुडी भरवणारी थंडी अनुभवणारे नाशिक या हंगामात अद्यापपर्यंत कडाक्याच्या थंडीपासून वंचित राहिले आहे. उत्तरेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव नाशिकच्या वातावरणावर होतो. उत्तरेकडे बर्फवृष्टी व तीव्र थंडी असतानाही पश्चिम भागातील स्थितीमुळे वाऱ्यांना अवरोध निर्माण झाला आहे. अल निनोचाही प्रभाव आहे. याची परिणती हंगामात नाशिकचा पारा १२.५ अंशापेक्षा खाली न घसरण्यात झाल्याचे हवामानशास्त्र तज्ज्ञ सांगतात. खरेतर या काळात नाशिकमध्ये सलग काही दिवस थंडीची लाट मुक्काम ठोकते. या वर्षी एकदाही तशी स्थिती निर्माण झालेली नाही. या घटनाक्रमात बुधवारची सकाळ वेगळी ठरली. शहर व ग्रामीण भागात सर्वत्र दाट धुक्याची दुलई पसरली होती.
थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमधून या हंगामात थंडी जणू पळून गेल्याची स्थिती आहे. कारण, दिवाळीपासून आजतागायत म्हणावी तशी थंडी जाणवलेली नाही. हवामानशास्त्र विभागाच्या नोंदी पाहिल्यावर ही बाब स्पष्ट होते. बुधवारी सकाळी १५.९ अंश तापमानाची नोंद झाली. या दिवशी शहर व ग्रामीण भागात सर्वत्र दाट धुके पसरले होते. गोदावरी काठावर तर नदी दृष्टीपथास पडत नव्हती. रस्ते व पुलांवर मार्गक्रमण करताना वाहनांना सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत दिवे लावणे क्रमप्राप्त ठरले. सकाळी आर्द्रतेचे प्रमाण ९० टक्के होते. ही स्थिती दाट धुके तयार होण्यास कारक ठरली.
आणखी वाचा-पुष्पा चित्रपटाप्रमाणे धुळे जिल्ह्यात बनावट देशी दारुची वाहतूक, तीन लाखाचा मुद्देमाल हस्तगत
कडाक्याच्या थंडीपासून नाशिक अद्याप दूर राहिले आहे. मागील काही वर्षात सातत्याने कमी होणाऱ्या तापमानाने प्रत्येक हंगामात अनेक दिवस थंडीची अनुभूती मिळत होती. त्यातही डिसेंबर व जानेवारीमध्ये तर मुख्यत्वे नीचाकी तापमानाची नोंद होत असे. या काळात पारा अनेक दिवस १० अंशापेक्षा खाली गेल्याची उदाहरणे आहेत. यंदाचा हंगाम मात्र त्यास अपवाद ठरला.
यंदा १६ आणि २५ डिसेंबर २०२३ रोजी अनुक्रमे १२.५ आणि १२.६ अंश यापेक्षा यंदा तापमान खाली घसरलेले नाही. सलग काही दिवस ही पातळी राखली न गेल्याने थंडीची लाट जाणवू शकली नाही, असे चित्र आहे. मागील तीन हंगामातील नीचांकी तापमान आणि यंदाची स्थिती नाशिक चालू हंगामात कडाक्याच्या थंडीपासून दूर राहिल्याचे अधोरेखीत करीत आहे.
आणखी वाचा-धुळे जिल्ह्यात सरपंचावर तलवारीने हल्ला, पदाचा राजीनामा न दिल्याचा राग
धुके का निर्माण होते ?
हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ७५ टक्क्यांहून अधिक असेल आणि तापमान कमी झाल्यास वातावरणात बदल होऊन धुके तयार होते. बुधवारी आर्द्रतेचे प्रमाण ९० टक्के होते. पाराही काहिसा कमी झाल्यामुळे सर्वत्र दाट धुके पसरले. या हंगामात आतापर्यंत १२.५ अंश या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. पश्चिमेकडील काही अवरोध व अल निनोच्या प्रभावाने या हंगामात आतापर्यंत थंडीची लाट आली नसल्याची स्थिती आहे. -वैशाली वडनेरकर (वैज्ञानिक अधिकारी, हवामानशास्त्र विभाग, नाशिक)
नीचांकी तापमानातील फरक
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार २०२० या वर्षात २३ डिसेंबर रोजी ८.२ अंश नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. तर त्यापुढील वर्षाच्या हंगामात म्हणजे २५ जानेवारी रोजी ६.३ अंशापर्यंत तापमान खाली घसरले होते. गत हंगामात १० जानेवारी रोजी ७.६ अंश या नीचांकी तापमानाची नोंद झाली. त्या हंगामात डिसेंबरमध्ये ९.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. डिसेंबरमध्ये अनेकदा काही दिवस पारा १० अंशाचा खाली असतो. त्यामुळे थंडीची लाट आल्याची अनुभूती मिळते. चालू हंगामात तापमान १२.५ अंशाच्या खाली गेलेले नाही. या पातळीवर ते तग धरू शकले नाही. त्यामुळे कडाक्याची थंडी तसेच थंडीच्या लाटेची अनुभूती नाशिककरांना मिळू शकलेली नाही.