डाकीण असल्याच्या संशयाने एका महिलेचे हात बांधून स्मशानभूमीतून तिला फिरवित मारहाण करण्याचा आल्याचा प्रकार अक्कलकुवा तालुक्यातील कुकरखाडीपाडा गावात घडला आहे. या प्रकरणी मोलगी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून डाकीण कूप्रथेने पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे या घटनेवरुन दिसत आहे.
हेही वाचा : विश्लेषण : ‘आदिपुरुष’वर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? सेन्सॉर बोर्डचे नियम जाणून घ्या
अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम डाब भागातील कुकरखाडी पाडा येथे संशयित मोकन्या वसावे याच्या बहिणीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. पीडितेने जादुटोणा केल्यानेच बहिणीचा मृत्यू झाल्याचा संशय वसावेने घेतला. त्या संशयातून सोमवारी सायंकाळी पीडित महिलेला डाकीण ठरवून तिला घराबाहेर काढून हात दोरीने बांधण्यात आले. संशयिताच्या कुटुंबियांनी तिला बळजबरीने स्मशानभूमीत नेले. स्मशानभूमीला फेऱ्या मारायला लावून तिला शपथ दिली. यानंतर काठी आणि नॉयलॉनच्या दोरीने तिला बेदम मारहाण करण्यात आली.
हेही वाचा : विश्लेषण : चीनला ‘जशास तसे’ उत्तर का नाही ?
रात्री संशयितांच्या तावडीतून पीडितेची सुटका झाली. दुसऱ्या दिवशी जवळपास १० किलोमीटरची पायपीट केल्यानंतर ती मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली. बुधवारी पीडितेने मोलगी पोलिसांकडे झालेल्या प्रकाराविषयी तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेवून अक्कलकुवा उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, अक्कलकुव्याचे पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर आणि मोलगी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक धनराज निळे यांनी घटनास्थळी भेट देत चौकशी सुरु केली आहे.