नाशिक – इगतपुरी तालुक्यातील धामणगाव शिवारात समृद्धी महामार्गांवर पहाटे चालकाचे नियंत्रण सुटल्याने रुग्णवाहिकेला अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू तर, बाळासह सहा जण जखमी झाले. हे सर्वजण मुक्ताईनगर आणि छत्रपती संभाजी नगर येथील रहिवासी आहेत.
छत्रपती संभाजी नगरकडून मुंबई येथे शुक्रवारी बालकाला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून नेण्यात येत असताना इगतपुरीच्या धामणगाव परिसरात पहाटे साडेचार वाजता चालकाचे नियंत्रण सुटल्याने रुग्णवाहिका विरुद्ध बाजूच्या दुभाजकाला धडकली. त्यानंतर चार ते पाच वेळा उलटल्याने रुग्णवाहिकेचा चक्काचूर झाला.
या अपघातात जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरहून संभाजी नगर येथे प्रसूतीसाठी गेलेल्या फेमिदाबी रउफ शेख (चौधरी) (वय ५५ ) यांचा जागीच मृत्यू झाला. गुलाम खान (३३ , रा. मुक्ताई नगर), रहेमान खान (४७, नांदूर, जि. बुलढाणा), रुग्णवाहिका वैद्यकीय अधिकारी सोहेल खान (२८, हरसूल, जि. संभाजी नगर), अशोक पाटील (४५, जालना रोड, जि.संभाजी नगर), रुग्णवाहिका चालक भगवान इंगळे (३५, रा. संभाजी नगर) यांच्यासह पाच दिवसांचे बाळ जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घोटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद पाटील यांनी तातडीने घटनेचे गांभीर्य पाहून हवालदार सतीश शेलार, राजाराम डगळे, गुरुदेव मोरे यांच्यासह घटनास्थळी धाव घेत जखमींना घोटीजवळील एसएमबीटी या सेवार्थ रुग्णालयात सरकारी वाहनाने दाखल केले. जखमींच्या नातेवाईकांना घटनेबाबत अवगत केले.
दरम्यान, समृध्दी महामार्गावर वारंवार अपघात होत असून अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या असतानाही अपघात होतच असतात. इगतपुरी तालुक्यातही समृध्दी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. समृध्दीवर वाहन उतरण्यापूर्वी वाहनांच्या टायर्सची स्थिती, वाहनाची स्थिती तपासली जाते.
समृध्दी महामार्गावर चालकाला डुलकी लागल्यानेही काही अपघात झाले आहेत. अतीवेगामुळे वाहन अनियंत्रित होण्यासारखे प्रकार घडतात. अनेक वाहनचालक प्रथमच समृध्दी महामार्गावर वाहन चालवताना वेगळाच अनुभव येत असल्याचे पाहून त्यांना वाहन वेगात चालविण्याचा मोह होतो. वाहन वेगात असताना अचानक ब्रेक लावल्यामुळेही वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता असते. समृध्दी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी अजूनही इतर उपाययोजना करण्याची गरज वारंवार होणारे अपघात पाहता निर्माण झाली आहे.