नाशिक : पती आणि सासरकडील इतर मंडळींच्या जाचाला कंटाळून आडगाव परिसरात विवाहितेने दोन आणि आठ वर्षांच्या मुलींना गळफास देऊन स्वत: इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली.
आडगावजवळील कोणार्क नगरातील हरिवंदन सोसायटीत बुधवारी ही घटना घडली. अश्विनी स्वप्निल निकुंभ (३०), अगस्त्या निकुंभ (दोन) आणि आराध्या निकुंभ (आठ) अशी मृतांची नावे आहेत. अश्विनीने आत्महत्येपूर्वी पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चित्रफित तयार केली. तिने चिट्ठीही लिहिली आहे. अश्विनीने चित्रफितीत, पती स्वप्नीलने वेळोवेळी त्रास दिल्याचे म्हटले आहे. स्वप्नीलचे विवाहबाह्य संबंध असल्याने तसेच पतीचा भाऊ तेजस आणि बहीण मयुरी यांच्याशी वाद झाल्याने पती वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देतो, असे नमूद केले आहे.
हेही वाचा…नाशिकरोडला युवकाची हत्या
सततच्या त्रासाला कंटाळून अश्विनीने दोन्ही मुलींना गळफास दिला. मंगळवारी रात्री दोन्ही मुलींचा मृत्यू झाल्याचा संशय असून बुधवारी सकाळी सातच्या सुमारास अश्विनीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. स्वप्निल पुण्यात कामाला असल्याने पोलीस पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाल्याची माहिती देण्यात आली