लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : शहरातील धोकादायक झाडे तोडली पाहिजेत, अशी भूमिका अनेक जण सातत्याने मांडत असताना काही जुनी झाडे नागरिकांच्या जीवावर बेतू लागली आहेत. विशेषत: गंगापूर रोडवरील धोकादायक झाडांचा मुद्दा नेहमी चर्चेत असतो. रविवारी सकाळी याच रस्त्यावर नऊच्या सुमारास धावत्या दुचाकीवर झाडाची फांदी पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. दुचाकीचालक जखमी झाला आहे. या अपघातानंतर जाग आलेल्या महापालिकेने रस्त्यावर येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम हाती घेतले.
सातपूर येथील शिवाजी नगरातील रहिवासी दीपक सोनवणे (३६) हे आई अलका (५५) यांच्याबरोबर दुचाकीने जात होते. सोमेश्वर बस स्थानकाजवळ ते आले असता त्यांच्या दुचाकीवर अचानक झाडाची फांदी पडली. फांदीचा मार लागल्याने अलका यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दीपक यांना डोक्याला तसेच छातीला मार बसला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदतकार्य केले. जखमी अलका तसेच दीपक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी अलका यांना मृत घोषित केले. या अपघातामुळे धोकादायक वृक्षांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
गंगापूर रोडवर ठिकठिकाणी धोकादायक वृक्ष आहेत. त्यांच्यामुळे अनेक अपघातही झाले आहेत. ही झाडे हटविण्यासाठी स्थानिकांनी आंदोलनेही केली आहेत. परंतु, पर्यावरणप्रेमींनी झाडे काढण्यास सातत्याने विरोध केला आहे. अलिकडेच महापालिका उद्यान विभागाच्या वतीने पर्यावरणप्रेमी आणि स्थानिकांची बैठक घेण्यात आली होती. परंतु, राजकीय दबावामुळे प्रश्न अनिर्णितच राहिला.
दरम्यान, रविवारच्या अपघातानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी ज्या झाडाच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत, त्या छाटण्यास सुरूवात केली.