स्वराज्य संघटनेचा लढा यशस्वी; त्र्यंबकेश्वरमध्ये मात्र कडकडीत बंद
त्र्यंबकेश्वर मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी सुरू असलेला स्वराज्य महिला संघटनेचा लढा गुरुवारी यशस्वी झाला. सकाळी सहा वाजता पोलीस बंदोबस्तात संघटनेच्या अध्यक्षा विनिता गुट्टे यांसह चार महिलांनी गर्भगृहात प्रवेश करून नव्या अध्यायास सुरुवात केली. दुसरीकडे, बुधवारी संघटनेच्या आंदोलकांना मारहाणप्रकरणी तिघांना अटक झाल्यानंतर ग्रामस्थांनी गुरुवारी कडकडीत बंद पाळला.
विनिता गुट्टे यांनी आक्रमक होत १५ दिवसांत तीन वेळा गर्भगृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी त्यांना देवस्थान विश्वस्त आणि स्थानिकांच्या रोषास तोंड द्यावे लागले. बुधवारी तर प्रकरण मारहाणीपर्यंत गेल्याने पोलिसांनी आंदोलकांच्या तक्रारीनंतर ३०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या या भूमिकेविरोधात स्थानिकांनी गुरुवारी ‘त्र्यंबकेश्वर बंद’ची हाक दिली होती. त्यातच गुरुवारी सकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात गुट्टे यांच्यासह चार महिलांनी गर्भगृहात प्रवेश करत पूजा केल्याची माहिती गावात पसरली. विधिवत पूजेनंतर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना त्वरित पोलिसांनी गावाबाहेर सुखरूप काढले.
महिलांनी गाभाऱ्यात प्रवेश केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. ही परंपरेला छेद देणारी कृती आहे. विश्वस्त आणि देवस्थानला परंपरा टिकवता आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. काही विश्वस्तांनी महिलांच्या या प्रवेशाविषयी बोलणे टाळले. प्रसिद्धी किंवा स्टंटबाजीचा हव्यास असणाऱ्या महिलाच यापुढेही हे धाडस करतील, अशी पुष्टी विश्वस्त डॉ. सत्यप्रिय शुक्ल यांनी जोडली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा