त्र्यंबकेश्वरमधील घटनाक्रमामुळे भाविकांमध्ये संताप
बारा ज्योतिर्लिगांपैकी एक ही त्र्यंबकेश्वर मंदिराची ओळख. यामुळे देशभरातून भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. मंदिर प्रवेशाबाबत लिंगभेद न करण्याच्या न्यायालयीन निर्णयानंतर या मंदिराच्या गर्भगृहात प्रवेशासाठी बुधवारी दुपारी काही महिला दाखल झाल्या. दीड दिवस ठिय्या देऊनही त्यांना गर्भगृहात प्रवेश मिळाला नाही. परंतु या काळात त्र्यंबकनगरीत त्यांना अतिशय हीन दर्जाची वागणूक मिळाली. आंदोलनावेळी मंदिर परिसरात शिवीगाळ व धक्काबुक्की झालीच. शिवाय, मंदिर सभोवतालच्या हॉटेलमध्ये पिण्याचे पाणी व चहा घेण्यास मज्जाव करण्यात आला. ज्यांनी कोणी तो दिला, त्यांनी त्यापोटी दिलेले पैसे संबंधितांच्या अंगावर फेकून दिले. इतकेच नव्हे तर, सार्वजनिक प्रसाधनगृहांचा त्यांना वापर करता येऊ नये म्हणून ती बंद करण्यात आली. देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या गावात घडलेल्या या घटनाक्रमाने अन्य भाविकही चकित झाले.
या संपूर्ण घडामोडींविषयी स्वराज्य महिला संघटनेने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात प्रवेश घेण्यासाठी संघटनेच्या वनिता गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दुपारी दाखल झालेल्या ३० ते ३५ महिला या घडामोडींमुळे गुरुवारी रात्री माघारी परतल्या. तत्पूर्वी मंदिर परिसर व गावात देवस्थानचे विश्वस्त, पुरोहित, स्थानिक नागरिक आणि हॉटेल व्यावसायिकांकडून आलेल्या विचित्र अनुभवांबद्दलची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. गर्भगृहात प्रवेशासाठी पहिल्या दिवशी उशिरापर्यंत संबंधितांचे आंदोलन सुरू होते. पहिल्या दिवशी देवस्थान कार्यालयात चर्चा होऊनही काही साध्य होत नसल्याने आम्ही दर्शनासाठी जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सुरक्षारक्षकांनी उत्तर दरवाजात अडवत पूर्व दरवाजातून जाण्यास सांगितले. रांगेतून दर्शनासाठी जात असताना मंदिरातील पुजारी, विश्वस्त, ग्रामस्थ अशा जवळपास २०० ते २५० जणांनी धक्काबुक्की करत मारहाण केली. शिवीगाळ करत अपमानित केल्याचे या महिलांनी म्हटले आहे. या घटनाक्रमामुळे आम्ही मंदिराच्या बाहेरील परिसरात आलो. विश्वस्तांनी पुन्हा चर्चेसाठी बोलाविले आणि देवस्थानच्या नियमानुसार गुरुवारी सकाळी सहा ते सात या कालावधीत आल्यास गर्भगृहात प्रवेश करण्यापासून कोणी रोखणार नाही, असे आश्वासन दिले. यामुळे गुरुवारी सकाळी सव्वा सहा वाजता आम्ही मंदिर परिसरात आलो. पण त्यावेळी मंदिर सभागृह व दर्शनासाठी मोठी गर्दी होती. गर्भगृहातील प्रवेशद्वारावर विश्वस्त, पुरोहित, नगरसेवक व स्थानिकांनी ओले सुती वस्त्र परिधान न केल्याचे कारण दाखवत प्रवेश नाकारला. यावेळी काही महिला प्रांगणातील कुंडातील पाणी घेण्यासाठी गेल्या असता त्यांना ते घेण्यास मज्जाव करण्यात आला. यावेळी स्थानिकांनी धक्काबुक्की व शिवीगाळ करत मंदिरातून लोटत बाहेर काढले. यामुळे आम्ही मंदिर परिसरात जमलो. परंतु, या ठिकाणी बसण्यास मनाई करण्यात आली. या ठिकाणी थांबल्यास गुन्हा दाखल केला जाईल, अशी तंबी देऊन आम्हाला बाहेर पिटाळण्यात आल्याचे या महिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मंदिराबाहेरील छोटय़ा हॉटेलमध्ये चहा व पाणी घेण्याचा प्रयत्न केला असता अनेकांनी तो नाकारला. अनेक हॉटेलमध्ये प्रयत्न केल्यावर काही महिलांना एका ठिकाणी मिळाला. परंतु, तो देताना संबंधित चालकाने दिलेले पैसे महिलांच्या तोंडावर फेकल्याचे गुट्टे यांनी सांगितले. या वेळी मंदिर परिसरात भाविकांसाठी असणारे सार्वजनिक प्रसाधनगृह बंद करण्यात आले. देवस्थान, पुरोहित, नगरसेवक व ग्रामस्थांनी ठिकठिकाणी या पद्धतीने वागणूक देऊन अवमानित केल्याची व्यथा आंदोलक महिलांनी तक्रारीत मांडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा