जळगाव – सण म्हटला की, पटकन आठवणार्या पदार्थांमधला एक अगदी आवडीचा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. हे नाव स्वतःशी उच्चारले, तर एका गोड-खरपूस गंधाची आपल्याला आठवण होते. सध्याच्या धावपळीच्या युगात पुरणपोळीतील अर्थकारण वाढले आहे. सणाच्या दिवशी शहरातून सुमारे पाच ते सात लाखांची उलाढाल असते. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुमारे पाच ते सहा हजार महिलांना या पुरणपोळी विक्रीतून रोजगार मिळत आहे. रविवारी (15 जानेवारी) मकरसंक्रांतीनिमित्त पुरणपोळी विक्रेत्या महिला ठिकठिकाणी दिसून आल्या.
पूर्वी पुरणपोळी म्हटले की, घरोघरी केवढातरी घाट घातला जायचा. आजच्या घाईगडबडीच्या जीवनशैलीत अनेकांना पूर्वीसारखे पुरणपोळ्या करणे जमत नसले, तरी सणाच्या निमित्ताने आजही थोड्या का होईना घरोघरी पुरणपोळ्या केल्या जातात. खुसखुशीत, मऊसूत, ताजी अस्सल मराठमोळी चवीची पुरणपोळी जिभेवर ठेवताच विरघळते. लहान-थोर सगळ्यांची लाडकी पुरणपोळी साजूक तुपासोबत एक लाजवाब पक्वान आहे. कोणत्याही सण-समारंभाला पुरणपोळीला नेहमीच पसंती असते. उत्तम प्रतीची हरभराडाळ, गूळ, साखर, जायफळ आणि वेलचीयुक्त पुरणपोळी फ्रिजमध्ये जास्त दिवस टिकते आणि फ्रिजबाहेर पाच दिवस राहते.
सध्याच्या धावपळीच्या युगात नोकरदार महिलांकडून या ग्रामीण भागातून आलेल्या महिलांकडून पुरणपोळ्या विकत घेतल्या जातात. सणाच्या दोन-तीन दिवसांपूर्वीच पुरणपोळ्यांची नोंदणी केली जाते. आता ही नोंदणी भ्रमणध्वनीवरूनही केली जाते. ग्रामीण भागातून या महिला पुरणपोळ्या घेऊन शहरात सकाळी सहापासून दाखल होतात. अवघ्या दोन तासांत त्या विकल्या जातात. कुटुंबातील सदस्यसंख्येनुसार पुरणपोळ्या विकत घेतल्या जातात. साधारणतः एका सदस्यासाठी एक-दीड पुरणपोळी याप्रमाणे मागणी नोंदविली जाते.
पुरणपोळ्यांचे अर्थकारण
प्रतिनगाप्रमाणे पुरणपोळी दिली जाते. सण-उत्सवांसह विवाह सोहळ्यांना विविध विधींच्या जेवणावळींसाठी पुरणपोळ्या लागतात. यासाठीही नोंदणी केली जाते. प्रतिनग पन्नास ते साठ रुपये याप्रमाणे पुरणपोळी विक्री केली जाते. पन्नासपेक्षा अधिक पुरणपोळ्यांची नोंदणी असेल तर चाळीस ते पंचेचाळीस रुपयांपर्यंत दर दिला जातो. शिवाय, मुंबई, पुणे, नाशिक यांसह राज्यातील महानगरांमध्ये पुरणपोळ्या पाठविल्या जातात. कारण, जास्त दिवस टिकत असल्यामुळे त्या हस्ते-परहस्ते अथवा नातेवाइकांमार्फतही पाठविल्या जातात, असे नकोबाई महाजन यांनी सांगितले.
हेही वाचा – जळगाव : रस्तेकामांची गुणवत्ता न राखल्यास मक्तेदारावर कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
असा आहे पुरणपोळीचा इतिहास
आवडणार्या आणि सणांचा गोडवा वाढविणार्या पुरणपोळीचा इतिहास प्रत्येक मराठी माणसाला माहिती हवाच. पुरणपोळी या शब्दातील पुरण हा शब्द पूर्ण या शब्दावरून आला. जी पोळी पूर्ण भरलेली असते, ती पुरणपोळी असा अर्थ त्यामागे आहे. बाराव्या शतकातील मंसोलस्सा या ग्रंथात पुरणपोळीचा उल्लेख आढळतो. चौदाव्या शतकात अल्लासनी पेड्डन यांच्या मनुचरित्र या तेलगू ग्रंथात बकशम या नावाने पुरणपोळीचा उल्लेख आढळतो. तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातही पुरणपोळीचा उल्लेख आढळतो. पुरणपोळी हे पुरणपोळीचे एकच नाव माहीत असले, तरी भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी होळिगे, उबट्टी, वेडमी, बोबटलू, बोळी, ओपुट्टू अशा विविध नावांनी पुरणपोळी ओळखली जाते. पेशवेकाळातही पुरणपोळ्या बनविल्या जायच्या. पानिपतच्या युद्धानंतर पुरणपोळीची ही पारंपरिक संस्कृती ठिकठिकाणी रुजविली गेली.
अशी तयार होते पुरणपोळी
साधारणपणे हरभराडाळीचे पुरण करून पुरणपोळी केली जाते. काही ठिकाणी तुरीच्या आणि मुगाच्या डाळीपासून पुरण बनवूनही पुरणपोळी बनविली जाते. राजस्थानच्या मारवाड भागात आणि गुजरातच्या कच्छ भागात मूगडाळीची पुरणपोळी बनविली जाते. कर्नाटकमध्ये मूगडाळ उबट्टी आणि नारळा उबट्टी असे पुरणपोळीचे दोन प्रकार केले जातात.
हेही वाचा – जळगाव : पहूर घरफोडीतील पाच संशयित ताब्यात, १७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
असे आहेत फायदे
गव्हाचे पीठ आरोग्यासाठी चांगले असते. गव्हाच्या पिठात तयार केलेल्या पुरणपोळीमध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, बी-कॉम्प्लेक्स, जीवनसत्त्वे आणि काही खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. त्याचा फायदा तुमच्या शरीराला होतो. तसेच, कणीक आणि डाळ एकत्र केल्याने तुम्हाला प्रथिने मिळतात. तसेच अमिनो अॅसिड मिळत असल्याने शरीरास अधिक फायदा होतो. गुळामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस हे घटक असतात. साखरेपेक्षा गूळ पचायला थोडा वेळ लागत असल्याने ऊर्जा बराच काळ पोटात साठून राहते. त्यामुळे, पचनसंस्था चांगली राहते. वेलची, केशर, जायफळ पावडर हे घटक पचन आणखी वाढवितात. त्यामुळे पुरणपोळी खाऊन शरीराला या काळात फायदाच होतो.
रोज रात्री हरभराडाळीचे पुरण तयार करते. मध्यरात्री एक-दीडला उठून चुलीवर खापर ठेवत पुरणपोळ्या तयार करते. पहाटे पाच-साडेपाचपर्यंत दीडशे पुरणपोळ्या तयार करते. रोज पंचवीस किलो हरभराडाळ, पंचवीस किलो गूळ यांसह इतर पदार्थ लागतात. सणाच्या दिवशी दीडशे पुरणपोळ्या सकाळी सहा ते आठ या दोन तासांत हातोहात संपतात. इतर दिवशी साठ ते सत्तर पुरणपोळ्या विकल्या जातात. पुरणपोळी प्रतिनग साठ रुपये असून, पाच-सहा पुरणपोळ्या घेतल्यास पन्नास-पंच्चावन्न रुपये याप्रमाणे विकते. आगाऊ नोंदणीही करून घेते. या पुरणपोळी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, असे नकोबाई महाजन (पुरणपोळी विक्रेती, धरणगाव) यांनी सांगितले.