‘आनंदींचा उत्सव’ कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांचा सल्ला; सामाजिक असुरक्षिततेविरुद्ध लढण्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण
महिला असण्यात गंमत आहे. त्या विविध जबाबदाऱ्या लीलया पेलतात. वेगवेगळ्या आघाडीवर काम करताना कोणतीच जबाबदारी त्यांच्याकडून नाकारली जात नाही. सध्या करिअरचे वेगवेगळे पर्याय समोर असल्याने चांगले शिक्षण घेऊन विविध व्यासपीठावर सक्रिय व्हा, असा सल्ला देतानाच समाज परिवर्तनाचे वारे वाहत असले तरी आपण कुठे थांबायला हवे हे प्रत्येकीला कळायला हवे, असा सल्ला खा. सुप्रिया सुळे यांनी दिला.
यशस्विनी सामाजिक अभियान, विश्वास बँक व अन्य काही संस्थांच्या सहकार्याने युवतींच्या सर्वागीण विकासासाठी गंगापूर रस्त्यावरील विश्वास लॉन्स येथे ‘आनंदीचा उत्सव..’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन खा. सुळे यांच्या हस्ते झाले. या वेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे, भुजबळ नॉलेज सिटीच्या शेफाली भुजबळ यांच्यासह अ‍ॅरोमाच्या संगीता दातार, रऊफ पटेल, सृष्टी नेरकर आदी मान्यवरांना खास आमंत्रित करण्यात आले होते.
वक्ते, व्यासपीठावरील मान्यवरांची उपस्थिती, वक्त्यांचे मार्गदर्शन यामुळे ‘आनंदी उत्सव’ की कोणत्या राजकीय पक्षाचा युवती मेळावा असा संभ्रम उपस्थितांमध्ये निर्माण झाला. उत्सवात मनोरंजनात्मक कार्यक्रम, मल्लखांब प्रात्यक्षिक, मोबाइलचा वापर कसा करावा, सायबर जगतातील गुन्हेगारी, शिक्षणाचा सक्षमीकरणासाठी उपाय कसा करता येईल, छेडछाडीला प्रतिबंध कसा करावा, सौंदर्य, आहार व खेळ, वयात आलेल्या मुलींमधील शारीरिक व मानसिक बदल, अंधश्रद्धेवर प्रहार, लग्नास उत्सुक युवतींच्या जोडीदारांकडून असणाऱ्या अपेक्षा यासह काही महत्त्वपूर्ण १५ स्टॉल्स मांडण्यात आले होते. या माध्यमातून युवतींना विविध विषयांवर हसतखेळत मार्गदर्शन करण्यात आले.
सुळे यांचा अपवाद वगळता बहुतांश वक्त्यांनी राष्ट्रवादीचे गोडवे गायले. सुळे यांनी आपली संस्कृती जपत आपण मराठी घरातील सुसंस्कृत आहोत हे विसरू नका. सर्व जबाबदाऱ्या पार पाडत कर्तृत्ववान व्हा, असे आवाहन केले. चुंबळे यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून जिल्ह्य़ाचा कारभार सांभाळता आल्याचे नमूद केले.
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विश्वास दाखविल्याने राजकारणात समाजकारण करता आले. पक्षाने युवती अर्थात नवा चेहरा प्रतिनिधित्व करेल, असा विश्वास दाखविल्याने ही वाटचाल सोपी झाली. त्यासाठी शिक्षणाचा उपयोग झाल्याचे चुंबळे यांनी सांगितले. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या उषा दराडे यांनी पक्षाच्या कामाची माहिती दिली.
भुजबळ यांनी भुजबळ नॉलेज सिटीचा कार्यभार सांभाळताना विविध अडचणींना तोंड देत सर्व पातळीवर समन्वय साधावा लागतो असे नमूद केले. हे करताना कौटुंबिक अडचणी पार पाडत विविध जबाबदाऱ्या स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, हा खटाटोप ज्या विद्यार्थिनी, युवतींसाठी होता, त्यातील बहुतेकांना आपण उत्सवात का आलो असा प्रश्न पडला. काही युवती हिरवळीवर भ्रमंतीत तर काही खा. सुळे यांच्यासह मान्यवरांसोबत, एखाद्या स्टॉलवर मैत्रिणींसमवेत ‘सेल्फी’ काढण्यात दंग राहिल्या. काहींनी भोजनाचा आस्वाद घेत उर्वरित वेळेत अभ्यास पूर्ण करण्याकडे कल ठेवला.
सभागृहात आमची वेगळ्याच विषयावर चर्चा
शांततेने समोरचा काय बोलतो हे ऐकण्याची माझी क्षमता कमी आहे. एक दोन जणांची भाषणे झाली की, मी कंटाळते आणि दुसऱ्याशी बोलण्यास सुरुवात करते. संसदेत अधिवेशन काळात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असताना तेच तेच मुद्दे येतात. यामुळे मी बाजूच्या खासदाराशी कधी साडी, पार्लर, फॅशन यासह अन्य कोणत्याही विषयावर बोलते. आम्ही सर्व असेच करत असतो. चित्रवाहिनीवर एखाद्या गहन विषयावर चर्चा सुरू असल्याचे वाटते. प्रत्यक्षात आमचा संवाद वेगळ्या विषयावर सुरू असतो, असे खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Story img Loader