लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना ठराविक अंतराने शिवसेना शिंदे गटात आणून पक्ष मजबूत करण्याचे प्रयत्न जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून एकिकडे होत असताना जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदासाठी दोन महिलांमध्ये आधी बैठकीत नंतर पोलीस ठाण्यातच जुंपली. पालकमंत्री दादा भुसे, भाऊसाहेब चौधरी या नेत्यांनाही वाद शमविता आला नाही. मुंबई नाका पोलीस ठाण्यात सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
शिंदे गट सत्तेत येऊन वर्ष पूर्ण होण्याची वेळ आली असतानाही अद्याप जिल्हा कार्यकारिणी निवडीचे काम सुरुच आहे. जिल्हा महिला आघाडी कार्यकारिणी अद्याप जाहीर झालेली नाही. त्यासंदर्भात शनिवारी विश्रामगृहावर बैठक बोलविण्यात आली होती. महिला आघाडी जिल्हा अध्यक्षपदी लक्ष्मी ताठे आणि शोभा मगर या दोन दावेदारांमध्ये बैठकीतच वाद सुरू झाले. यावेळी संपर्कप्रमुख भाऊसाहेब चाैधरी, पालकमंत्री दादा भुसे उपस्थित होते. मात्र दोन महिलांच्या भांडणात त्यांनाही हात टेकावे लागले.
हेही वाचा… विटंबना निषेधार्थ धुळ्यात मोर्चा
दरम्यान, काठे यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे गाठले. शोभा मगर आणि त्यांचे समर्थकही त्या ठिकाणी पोहचले. दोन्ही गटात मारामारी झाली. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.