शहर वाहतूक पोलिसांमार्फत रस्ता सुरक्षा पंधरवडय़ात मार्गदर्शन केले गेले असले तरी नियमांचे पालन होत नसल्याने अंतर्गत रस्त्यांवर अपघातांची मालिका कायम आहे. गुरुवारी दुपारी मेरी-म्हसरूळ ते मुंबई-आग्रा महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर मालमोटारीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिला ठार झाली तर तिच्यासोबत असणारे पाच वर्षीय बालक सुदैवाने बचावले.
महामार्गावरील रासबिहारी चौकाची काही वर्षांपासून अपघात चौक अशी ओळख झाली आहे. या चौकात आजवर अनेक अपघात घडले. या चौकातून मेरी-म्हसरूळकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला. शहरातून महामार्गावर जाऊ इच्छिणारे वाहनधारक प्रामुख्याने या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. शिल्पा जगदीश पवार (३२) या मुलगा अर्णव (५) ला घेऊन दुपारी साडेबाराच्या सुमारास पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी गेल्या. घरी परतण्यासाठी त्या चौफुलीकडून वळत असताना मालमोटारीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. मालमोटारीच्या चाकाखाली सापडून शिल्पा यांचा जागीच मृत्यू झाला तर धडकेत अर्णव काही अंतरावर फेकला गेला. त्यास किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघात घडल्यानंतर मालमोटार चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी त्याचा पाठलाग केला. या गदारोळात परिसरात बघ्यांची गर्दी झाल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. शहरातील अंतर्गत रस्त्यांवर दिवसा अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Story img Loader