लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: श्रावण म्हणजे सण, उत्सवाची रेलचेल. यंदा अधिक मास श्रावणात आल्याने श्रावणाची लगबग जरा उशीराने सुरू होणार असली तरी महिला वर्ग श्रावणाच्या जय्यत तयारीला लागला आहे. अधिक मासातील पूजा, दान धर्मानंतर महिलांना मंगळागौरचे वेध लागले आहेत. मंगळागौरीचे खेळ आयोजित करण्यापेक्षा महिलांचा कल आपल्याला जमेल तसा खेळ करण्याकडे असून त्यासाठी प्रशिक्षक किंवा मंगळागौर खेळ खेळणाऱ्या समुहाकडे प्रशिक्षण सुरू झाले आहे.
रिमझिम सरी… हिरवा बहरलेला निसर्ग…सभोवताली सुरू असलेला ऊन-पावसाचा खेळ अशा उत्साहपूर्ण वातावरणात श्रावणाची वर्दी येते. या महिन्यात खऱ्या अर्थाने सण, उत्सवाची अनुभूती घेता येते. श्रावणातील सोमवारनंतर सर्वांसाठी चर्चेचा विषय असतो तो मंगळागौर खेळांचे. रोजच्या धावपळीत, नोकरी-घरकाम सांभाळत मंगळागौरीचे खेळ प्रत्येकाला खेळताच येतात, असे नाही. मंगळागौर खेळाची हौस बऱ्याचदा फुगड्या, बैठी फुगडीवर भागविली जात होती.
हेही वाचा.. मणिपूर घटनेच्या निषेधार्थ जळगावात मूकमोर्चा
यंदा मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बाईपण भारी देवा चित्रपटामुळे हे चित्र पालटले आहे. महिलांचा तुफान प्रतिसाद मिळालेल्या बाईपण भारी देवा चित्रपटात मंगळागौरीचे वेगवेगळे खेळ दाखविण्यात आले असून त्याचा प्रभाव यंदाच्या मंगळागौरीवर पडू लागला असल्याचे दिसून येत आहे. महिलांकडून मंगळागौरीची पूजा करण्यासह खेळ स्वत: खेळण्याला प्राधान्य दिले जाते.
हेही वाचा.. नाशिक : विशेष फेरीसाठी ४, ४८७ अर्ज; अकरावी प्रवेश प्रक्रिया
याविषयी हिरकणी ग्रुपच्या मृणाल कुलकर्णी यांनी माहिती दिली. दरवर्षीप्रमाणे मंगळागौर खेळांना प्रतिसाद चांगला आहे. श्रावणाच्या चारही मंगळागौरीसाठी नोंदणी झाली आहे. त्यामुळे मागील तीन आठवड्यापासून सराव सुरू झाला आहे. विशेष म्हणजे, काहींनी खेळांचे आयोजन करण्यापेक्षा आम्हाला मंगळागौरीचे खेळ शिकवा, अशी अशी गळ घातली आहे. यामुळे मंगळागौरीचे खेळ शिकविण्याचे वर्ग सुरू झाले आहेत. या वर्गाला सद्यस्थितीत वेगवेगळ्या वयोगटातील २० पेक्षा अधिक महिला शिकत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
हेही वाचा… नाशिक: कांदा अनुदानासाठी ४३५ कोटीचा प्रस्ताव सादर, २१ हजारहून अधिक शेतकरी अपात्र
मैत्री ग्रुपच्या पद्मावती घोडके यांनीही माहिती दिली. आम्ही पारंपरिक पध्दतीने मंगळागौरीचे खेळ खेळण्याला प्राधान्य देतो. फुगड्या, अटुशपान, सासु-सुनेचे भांडण, होडी, टाम तवली, आई मी येऊ का, असे वेगवेगळे पारंपरिक खेळ खेळले जात आहेत. दोन ते तीन आठवड्यापासून आमचा सराव सुरू असून मंगळागौरीच्या खेळासाठी लोकांचा प्रतिसाद उत्तम लाभत असल्याचे घोडके यांनी सांगितले.
बाईपण भारी देवा चित्रपटात आयुष्य स्वत:साठी जगा, असा संदेश देण्यात आलेला आहे. या चित्रपटातील सहा बहिणींच्या साड्या, दागिने यांचाही प्रभाव यंदा मंगळागौरीची तयारी करणाऱ्या महिलांवर होत आहे. मंगळागौरीसाठी देखणे दिसावे म्हणून महिलांनी ब्युटीपार्लरमध्ये आगाऊ नोंदणी केली आहे. महिलांची आवड पाहता ५०० ते ३००० रुपयांपर्यंत विविध पॅकेज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, आई-मुलगी, सासु-सुना यांनी या सर्वांसाठी नोंदणी करुन आपल्या वेळा निश्चित केल्या आहेत.