नाशिक – जातपंचायतीच्या सर्वच घटनांमध्ये महिलांवर अन्याय, अत्याचार झाल्याचे दिसून येत आहे. महिलांच्या इतर प्रश्नांसह जातपंचायतीकडून झालेल्या अन्यायाच्या व्यथा आता संयुक्त राष्ट्रसंघ पुरस्कृत आंतरराष्ट्रीय महिला आयोगात मांडल्या जाणार आहेत. त्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती तथा स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा नीलम गोऱ्हे विशेष प्रयत्न करत असल्याची माहिती जातपंचायत मूठमाती अभियानाचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी दिली आहे.
आंतरराष्ट्रीय महिला आयोगाने सहा ते १७ मार्च या कालावधीत न्युयाॅर्क येथील त्यांच्या कार्यालयात ६७ वे सत्र आयोजित केले आहे. नीलम गोऱ्हे अध्यक्षा असलेल्या स्त्री आधार केंद्राने इतर अनेक संस्थांप्रमाणे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अर्थिक व सामाजिक परिषदेचे सदस्यत्व घेतले आहे. या अंतर्गत ११ मार्च रोजी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ग्रामीण भागात महिलांनी सार्वजनिक ठिकाणचे अत्याचार रोखण्याच्या कामात मिळविलेले यश’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. गेल्या दहा वर्षांत ग्रामीण भागात महिला अत्याचार रोखण्यासंदर्भात आलेल्या अडचणींवर कशी मात केली, त्यातून बाहेर निघण्यासाठी काय प्रयत्न झाले, याबरोबरच शासन स्तरावरून याबाबत मार्ग काढण्यासाठी कोणत्या प्रकारच्या विकास योजना तयार करता येतील, याचा उहापोह होईल. यामध्ये नाशिक येथील जातपंचायत मूठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह चांदगुडे सहभागी होणार आहेत.
हेही वाचा – सावरकर थीम पार्कसह संग्रहालयासाठी पाच कोटींचा निधी, मंगलप्रभात लोढा यांची घोषणा
हेही वाचा – नंदुरबार, धुळे जिल्ह्यात उद्यापासून भोंगऱ्या बाजाराला सुरुवात; आठवडाभर होळी उत्सव
स्त्री आधार केंद्राने ‘ग्रामीण महिलांच्या अत्याचार विरोधी संघर्षात समाज व पोलिसांकडून अपेक्षा’ या विषयावर परिसंवाद घेतला होता. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात तज्ज्ञ व्यक्ती म्हणून चांदगुडे उपस्थित होते. त्यात त्यांनी जातपंचायतीमुळे पीडित महिलांच्या दाहक व्यथा मांडल्या. ते ऐकून सभागृह स्तब्ध झाले होते. इतर महिलांनीही आपले अनुभव कथन केले. गोऱ्हे यांनी ग्रामीण भागात महिलांच्या होणाऱ्या अत्याचाराबाबत माहिती देऊन समाज व पोलीस प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी गोऱ्हे, अनिता शिंदे, कोमल वर्दे आदी उपस्थित होते.