जळगाव : महिलांवरील अत्याचार हे अक्षम्य पाप असून कुणीही दोषी असला, तरी त्याला शिक्षा होणे आवश्यक आहे. दोषींना मदत करणाऱ्यांचीही गय करू नये, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. येथे आयोजित ‘लखपती दीदी’ संमेलनात ते बोलत होते. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्राची राज्य सरकारांना संपूर्ण साथ असेल, अशी ग्वाहीदेखील पंतप्रधानांनी दिली.

रविवारी जळगाव येथील प्राइम इंडस्ट्रियल पार्क मैदानात पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत लखपती दीदी संमेलन पार पडले. संत मुक्ताई, जिजाऊ, सावित्रीबाई फुले, बहिणाबाई यांच्या कार्याचा उल्लेख करून पंतप्रधानांनी महिला सुरक्षेविषयी राज्य सरकारांना जबाबदारीची जाणीव करून दिली. भारतीय न्याय संहितेतील तरतुदींमुळे आता महिला घरबसल्या ई-तक्रार करू शकतात. नवीन कायद्यात अशा प्रकरणातील दोषींना फाशी व जन्मठेपेची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहितेत विवाहाशी संबंधित फसवणूक प्रकरणे व छळवणुकीचा अंतर्भाव करण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले. देश स्वतंत्र झाल्यापासून सात दशकांत तत्कालीन सरकारांनी महिलांसाठी जे काम काम केले नाही, तितके काम मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत केल्याचा दावा करताना त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महायुतीसारख्या स्थिर सरकारची गरज असल्याचे ते म्हणाले. द्वितीय विश्वयुद्धावेळी पोलंडच्या हजारो महिला व मुलांना कोल्हापूरच्या राज परिवाराने आश्रय दिला होता. त्यामुळे पोलंडवासीयांनी कोल्हापूरकरांच्या सेवा भावनेचा सन्मान करण्यासाठी आपल्या देशात स्मारक उभारल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांच्या मागण्यांकडे पंतप्रधानांचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांविषयी प्रश्नांबाबत भाषणात अवाक्षरही नाही

पंतप्रधानांनी संमेलनापूर्वी देशातील निवडक ८० लखपती दीदींशी संवाद साधला. देशातील वेगवेगळ्या राज्यांतील बँक सखी, ड्रोन दीदी, पशु दीदी, कृषी दीदी म्हणून नावारूपाला येऊन लखपती झालेल्या महिला या वेळी उपस्थित होत्या. लखपती दीदी योजनेमुळे त्यांच्या जीवनमानात झालेल्या बदलाविषयी मोदी यांनी संवादाच्या माध्यमातून जाणून घेतले. या वेळी देशातील स्वयंसहायता बचत गटांच्या ४८ लाख सदस्यांना २५०० कोटी रुपयांचा निधी आणि स्वयंसहायता बचत गटांच्या २६ लाख सदस्यांना पाच हजार कोटीचे बँक कर्ज वाटपही मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

दोन महिन्यांत ११ लाख ‘लखपती दीदी’

देशातील तीन कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान या वेळी म्हणाले. गेल्या १० वर्षांत एक कोटी लखपती दीदी झाल्या. केंद्रात तिसऱ्यांदा आपले सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत त्यात ११ लाखांची भर पडली असून त्यातील एक लाख ‘दीदी’ महाराष्ट्रातील असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.