महिला विशेष शाखेची कामगिरी
गेल्या काही वर्षांत महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण सातत्याने वाढत असताना दुसरीकडे चार भिंतींच्या आड होणाऱ्या अत्याचाराने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ आली. त्यातून विभक्त होण्याचे प्रमाण वाढत असताना यावर विश्वास आणि संयमाने फुंकर घालण्याचे काम पोलिसांच्या महिला विशेष सुरक्षा शाखेच्या वतीने होत आहे. कौटुंबिक वादविवाद, घरगुती हिंसाचार याविरोधात पोलीस ठाण्यात तसेच शाखेत आलेल्या तक्रारींचा निपटारा करताना केवळ समुपदेशनाच्या माध्यमातून १५० हून अधिक विभक्त होऊ पाहणाऱ्या दाम्पत्यांनी एकत्र येत गुण्या-गोविंदाने नांदण्यास सुरुवात केली आहे.
महिला विशेष सुरक्षा शाखेत महिलांवरील अत्याचार, त्यांची कुटुंबीयांकडून होणारी शारीरिक, मानसिक, आर्थिक पिळवणूक, त्यांचे शोषण, आत्महत्येस प्रवृत्त करणे यासह अन्य काही तक्रारींचा ओघ सातत्याने सुरू आहे. कौटुंबिक वादावर पोलीस किंवा न्यायालयात दाद मागता येऊ शकते, हा विचार आता ग्रामीण भागातही रुजल्याने शहरी व ग्रामीण भागातून दिवसाकाठी आठ ते १० जोडपी आपल्या तक्रारी घेऊन या ठिकाणी येतात. त्यात सुशिक्षित महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यात प्रामुख्याने दारूचे व्यसन, पती किंवा पत्नी यांच्या पैकी एकाची संशयी वृत्ती, दोघांच्या घरामधील ज्येष्ठ मंडळींचा आयुष्यात असणारा अवास्तव हस्तक्षेप यासह सर्वात महत्त्वाचे म्हणजे विवाहबाह्य़ संबंध यामुळे अनेकांनी पोलीस ठाण्याची किंवा शाखेची पायरी ओलांडत न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१५ या कालावधीत विविध तक्रारींचा अंतर्भाव असणारे ६८४ अर्ज शाखेत प्राप्त झाले. २०१६ वर्षांतील पहिल्या चार महिन्यांत हा आकडा २४०च्या घरात पोहोचला आहे. प्राप्त अर्जाचा निपटारा करताना महिला विशेष सुरक्षा शाखेकडून प्रथम समुपदेशनाचा मार्ग अवलंबला जातो. यामध्ये पती, पत्नी यांची बाजू ऐकून घेतली जाते. त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे जाणून या वादावर काय तोडगा काय निघू शकतो यावर साधकबाधक चर्चा करत कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई न करता मध्यस्थी करण्याचा प्रयत्न होतो. यामध्ये पहिल्या तीन कारणांमध्ये तडजोड होऊन जाते. मात्र विवाहबाह्य़ संबंधाबाबत पती किंवा पत्नी एकत्रित राहण्यास तयार नसल्याने ते प्रकरण न्यायालयाकडे वर्ग करण्यात येते. शाखेकडे गेल्या वर्षभरातील ६८४ पैकी १४९ तसेच चालू वर्षांतील २४० अर्जापैकी ३८ जोडपी समुपदेशनाच्या माध्यमातून एकत्र येत नांदण्यास तयार झाली आहेत. मात्र, समुपदेशनाच्या या प्रक्रियेत महिलांना किंवा जोडप्यांना केवळ समोरील व्यक्तीला धडा शिकवायचा असतो. त्याला कायदेशीररीत्या कचाटय़ात अडकवत त्रास देणे ही ८० टक्के जोडप्यांची मानसिकता आहे. गंमत अशी की, हे त्यांचे वैयक्तिक मत नाही. कोणी तरी घरातील वरिष्ठ किंवा ओळखीच्या सल्ल्यातून ते या निर्णयापर्यंत येतात. विशेषत: महिलांच्या बाबतीत हा अनुभव नित्याचा आहे. त्यामुळे समुपदेशनाच्या बाबतीत अनेकदा अडचणी येतात. तारीख देऊनही समोरील एक कोणी तरी आलेले नसते. काही नेहमी दोषारोप करण्यात मग्न असतात, असे शाखा प्रमुख साहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा काशीद यांनी सांगितले.

Story img Loader