लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव : शहरासह जिल्ह्यात वाळूमाफियांची मुजोरी दिवसागणिक वाढतच आहे. गेल्या काही दिवसांत महसूल पथकांवर हल्ले होत आहेत. वाळूमाफियांकडून महसूल पथकांवर नजर ठेवली जात आहे. अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी कारवाई मोहिमेतील महिला तहसीलदारांच्या वाहनाचा आठ ते १० दुचाकींवरुन पाठलाग होत असलेली चित्रफीत प्रसारित झाली आहे. पाठलाग करणार्यांवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पोलिसांना दिल्या आहेत.
शहरासह जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन, वाहतूक व विक्री जोरात सुरू आहे. जिल्ह्यातील गिरणा, तापी, बोरी, पांझरा यांसह इतर नद्यांतून वाळू उत्खनन, वाहतूक होत आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महसूल विभागाला कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने महूसल, पोलीस व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांची संयुक्त पथकेही नियुक्त केली आहेत. या पथकांद्वारे नियमित अवैध वाळू उत्खनन, वाहतुकीवर लगाम लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विनाभांडवली कोट्यवधींची कमाई करून देणारा उद्योग म्हणून वाळूच्या धंद्यात हजारो लोक गुंतले असून, वाळू राखण करणार्या प्रशासकीय यंत्रणेवर पाळत ठेवण्यासाठी वाळूमाफियांकडून पथके नियुक्त आहेत. शासकीय कार्यालये, पथकातील अधिकारी, कर्मचार्यांचे निवासस्थान आणि नद्यांपर्यंतच्या टप्प्यातील प्रमुख हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम या पथकातील सदस्य करीत आहेत. कारवाईसाठी गेलेल्या प्रशासकीय पथकांवर वाळूमाफियांकडून हल्ले केले जात आहेत.
आणखी वाचा-नाशिक : अजून एका माजी मंत्र्याचा उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र
काही दिवसांत वाळूमाफियांकडून प्रशासकीय यंत्रणांच्या पथकांतील अधिकार्यांवर हल्ले गेले जात असल्याचे समोर आले आहे. एरंडोल येथील प्रांताधिकार्यांना गळा दाबत मारण्याचा प्रयत्न झाला. निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावरही जीवघेणा हल्ला झाला. यांसह जिल्हाभरात पथकातील तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल आदींवर वाळूमाफियांकडून हल्ले झाले आहेत. अजूनही वाळूमाफियांची मुजोरी सुरू असल्याचे दिसून आले आहे. यातच गिरणा नदीपात्रातून निमखेडीमार्गे अवैध वाळू वाहतुकीवरील कारवाईसाठी गेलेल्या महिला तहसीलदार शीतल राजपूत यांच्या शासकीय वाहनाचा आठ ते १० दुचाकीस्वारांनी चित्रपटातील दृश्यप्रमाणे पाठलाग करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराची ध्वनिचित्रफीत जिल्हा प्रशासनाने प्रसारित करुन असल्या दबावाला बळी पडणार नसल्याचे आव्हानच वाळूमाफियांना दिले आहे.
आणखी वाचा-भेसळयुक्त सुपारींचा तीन कोटी रुपयांचा साठा जप्त, ११ मालमोटारींमधून अवैध वाहतूक
तहसीलदार राजपूत यांच्या पथकाने निमखेडी परिसरातून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेतले. कारवाईला जात असताना त्यांच्या वाहनाचा पाठलाग होत असतानाची ध्वनिचित्रफीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमातून प्रसारित करण्यात आली. ती अधिकार्यांनी कर्तव्यावर असताना चित्रित केली आहे. ध्वनिचित्रफितीत शासकीय वाहनासोबत दुचाकी धावत असल्याचे दिसत आहे. अधिकार्यांच्या पथकाला धमकावण्याचा प्रयत्नही असू शकतो. अशा गस्तीत अधिकारी, कर्मचारी जीव धोक्यात घालतात. या बदल्यात खोट्या तक्रारी दाखल केल्या जाणे व समाजमाध्यमातून टिकेच्या स्वरूपात मानसिक छळाला तोंड द्यावे लागते. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी असे हल्ले, धमक्या व धमकावूनही कर्तव्य बजावत राहतील. दबावाला बळी पडणार नसल्याचेही ध्वनिचित्रफीत प्रसारित करताना म्हटले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनीही तहसीलदारांच्या वाहनाचा पाठलाग होत असल्याबाबतची ध्वनिचित्रफीत प्राप्त झाली असल्याचे सांगितले आहे.
देशाच्या नैसर्गिक संपत्तीचे, बेकायदेशीर उत्खननासाठी आणि अवैध वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियमित गस्त घातली जाते. अशीच गस्त सुरू असताना तहसीलदारांच्या वाहनाचा पाठलाग करताना दुचाकीवर दिसून आले. शौर्याने आणि धैर्याने रात्रंदिवस कर्तव्य बजावणार्या कारवाईच्या पथकातील अधिकारी, कर्मचार्यांना धमकावण्याचा प्रयत्न असू शकतो. ध्वनिचित्रफितीच्या अनुषंगाने संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. -आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, जळगाव)