लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप होत असल्याने अद्दल घडवण्यासाठी पत्नीने दुसऱ्याच्या मदतीने पतीच्या अंगावर साप सोडून मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार म्हसरूळ परिसरात उघडकीस आला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा-नाशिक : १४ वर्षाच्या मुलीचा विवाह रोखण्यात पोलिसांना यश
म्हसरूळ येथील राजेंद्र जगताप हे पत्नी सोनीसह राहतात. त्यांना एक मुलगी आहे. शनिवारी रात्री उशीरा पती-पत्नीने मद्य सेवन केले. त्यानंतर सोनीने घराचा मागील दरवाजा उघडून दोन व्यक्तींना घरात घेतले. त्या दोघांनी राजेंद्रचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. सोनीनेही यासाठी मदत केली. त्याचवेळी राजेंद्र यांच्या अंगावर बॅगेतून आणलेला साप सोडण्यात आला. राजेंद्र यांना सापाने दंश केला. अशा परिस्थितीतही राजेंद्र यांनी सर्वांना प्रतिकार करुन घराबाहेर पळ काढला. मित्राचे घर गाठत नातेवाईकांशी संपर्क केल्यावर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून पत्नी सोनी आणि अन्य दोन व्यक्तींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.