नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवैध धंद्यांचा जोर पुन्हा वाढल्याचे लक्षात येताच जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी अवैध धंद्यांविरोधात धडक कार्यवाहीला सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात प्रथमच दिंडोरी तालुक्यातील उमराळे दूरक्षेत्राच्या गोळशी बीट पोलीस ठाण्याचे हवालदार बाळकृष्ण पजई यांनी महिला शांतता व दारूबंदी समिती स्थापन केली आहे. यामुळे गावातील अवैध धंद्यांना आवर घालण्यास मदत होणार आहे. अशा समित्या संपूर्ण जिल्ह्यात स्थापन करण्याची मागणी ग्रामीण भागातून होत आहे.

उमाप यांनी अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अवैध धंद्यांना लक्ष्य केले आहे. त्यात त्यांना काही प्रमाणात यशही आले. परंतु ग्रामीण भागातून सध्या पुन्हा अवैध धंदे सुरू झाल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे उमाप यांनी पुन्हा एकदा अवैध धंद्यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी छापे टाकून त्यांनी लाखोंचा ऐवज जप्त करत अवैध व्यावसायिकांविरोधात कारवाया केल्या आहेत. तसेच पोलिसांनाही आपापल्या भागात अवैध धंदे चालणार नाहीत, याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >>> पंचवटीत गोळीबार करणाऱ्या टोळीवर मोक्का, शहर पोलिसांची गुन्हेगारांविरुध्द कठोर कारवाई

या पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यातील उमराळे दूरक्षेत्राच्या गोळशी बीटाचे हवालदार बाळकृष्ण पजई यांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. यात बीटातील सर्व गावांमध्ये महिला शांतता आणि दारूबंदी समिती स्थापन करून महिलांना एकत्र आणले आहे. कायदेशीररित्या अवैध धंदेवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांना कशाप्रकारे मदत करायची, याचे मार्गदर्शन केले आहे. महिला वर्गाला पोलीस संरक्षण देत अवैध धंदेवाल्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत संयुक्तरीत्या कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत. यासाठी पजई यांचे मार्गदर्शन महिलांना मोलाचे ठरत आहे. गावातील महिलांना एकत्र आणत गावातील प्रमुख स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेत महिलांना अवैध धंदेवाल्यांच्या विरोधात एकत्र केले. गावात जुगार खेळताना जरी कोणी आढळला तरी त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन हवालदार पजई यांनी दिले.

हेही वाचा >>> जिल्ह्यात कापसावरून संघर्ष, शिंगाडे मोर्चे काढणारे दोन्ही मंत्री गेले कुठे?

महिलांना पोलीस ठाण्याकडून ओळखपत्रही देण्यात आले आहेत. गोळशी बीटातील आंबेगण, धागुर, चाचडगाव, झार्लीपाडा, गोळशी, पिंप्रज, शृंगारपाडा, महाजे आदी गावांतील महिलांना एकत्र करून महिला शांतता व दारूबंदी समिती स्थापन करण्यात आली आहे. महिला एकत्र येऊन गावात कोणी अवैध व्यवसाय करण्याचे धाडस करत असेल तर त्यांच्याविरोधात आक्रमक होतात. याविषयी पोलिसांना माहिती देत अवैध धंदेवाल्यांना पकडून देण्याचे काम महिला करीत आहेत. त्यामुळे या परिसरात अवैध धंद्यांना लगाम लावण्यासाठी महत्त्वाची मदत होत आहे. या समितीत हिराबाई पागे, लंका गायकवाड, यमुना पागे, जनाबाई गायकवाड, मंदाबाई गायकवाड, सखूबाई गायकवाड आदींचा समावेश आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक गावांमध्ये अशी समिती स्थापन होऊन अवैध धंदेवाल्यांवर धडक कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून पजई यांनी सुरू केलेल्या मोहिमेचे अनुकरण व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Story img Loader