तारांगण..आकाशगंगा..उपग्रह.. या खगोलीय विषयांच्या पलीकडे जात चमचमत्या ताऱ्यांची दुनिया, चमकणारा सूर्य आणि चांदण्यांच्या सान्निध्यात लपलेला चंद्र, छोटय़ा तारा आणि तारका यांच्या प्रतिकृतींचा आनंद कर्णबधिर विद्यार्थ्यांनी ‘तारांगण’च्या माध्यमातून घेतला. गुरुवारी महापालिकेच्या वतीने विशेष बालकांसाठी खास ‘तारांगण शो’चे आयोजन करण्यात आले होते. १३ व १५ डिसेंबर रोजी कर्णबधिर विद्यार्थी व नागरिकांसाठी हा शो पुन्हा होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील इच्छुकांनी सहभागी होण्यासाठी तारांगणकडे आधी नोंदणी करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
पालिकेच्या यशवंतराव चव्हाण तारांगण केंद्रात कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी खास दोन शो आयोजित करण्यात आले होते. या वेळी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमीत बग्गा यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेने पाठपुरावा करत तारांगण येथे खास ‘वंडर्स ऑफ द युनिव्हर्स’या अनोख्या शोचे आयोजन माई लेले शाळेच्या कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी केले.
शोमध्ये मुलांना समजावे तसेच खुणांद्वारे भाषेची उकल व्हावी, यासाठी प्रशिक्षकांनी उपस्थित राहत मुलांशी संवाद साधला. मुंबईच्या इन्फोव्हिजन टेक्नॉलॉजिसचे अभिजीत शेटे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. खास बालकांसाठी हा शो इव्हान अ‍ॅण्ड सुदरलॅण्ड, यूएसए, अ‍ॅस्ट्रल इंक, वेदार्थ अ‍ॅनिमेशन मुंबई व नेहरू तारांगण मुंबई यांनी तयार केला आहे. नाशिकमध्ये प्रथमच हा शो दाखविण्यात आला. यापूर्वी मुंबई, अलाहाबाद, सुरत येथे हा प्रयोग झाला. यासाठी अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे व अपूर्वा जाखडी यांनी विशेष परिश्रम घेतले.
शहरात कर्णबधिर व नागरिकांसाठी १३ व १५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता विशेष शोचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात धुळे, जळगांव, नंदुरबार आणि नगर येथील कर्णबधिर आणि विद्यार्थी, नागरिक सहभागी होऊ शकतात. इच्छुकांनी अधिक माहिती तसेच नाव नोंदणीसाठी ९८२२८ १९१९६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी केले आहे.

Story img Loader