लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्र या दरम्यान ४२५ दशलक्ष लिटर क्षमतेची साडेबारा किलोमीटर नवीन लोखंडी जलवाहिनी टाकण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. सध्या लोखंडी पाईपवर गंज प्रतिबंधक प्रक्रिया केली जात आहे. लवकरच खोदकाम होऊन प्रत्यक्ष पाईप टाकले जातील. या जलवाहिनीद्वारे पुढील ३० वर्षातील संभाव्य लोकसंख्येचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
गंगापूर धरणातून सध्या बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत सिमेंटच्या वाहिनीद्वारे पाणी आणले जाते. साधारणत: अडीच दशकांपूर्वी केलेली ही सिमेंटची जलवाहिनी जीर्ण झाली आहे. गळतीमुळे पाणी पुरवठ्यात अडथळे येतात. या पार्श्वभूमीवर, महापालिकेने १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून १८०० मिलीमीटर व्यासाची मुख्य लोखंडी जलवाहिनी टाकण्याचे निश्चित केले होते. प्रारंभी या कामासाठी २१० कोटींचा खर्च गृहीत धरण्यात आला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची प्रकल्प अहवालास तांत्रिक मान्यता घेऊन निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. हे काम जिंदाल कंपनीला मिळाले. विविध कारणांस्तव रखडलेल्या या कामाचा श्रीगणेशा झाला आहे.
आणखी वाचा-नाशिक : ओझरजवळ अपघातात बालिकेचा मृत्यू
नव्या जलवाहिनीचे काम नऊ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे. गंगापूर धरणातून शहरात येणाऱ्या उजवा तट कालव्याची जागा पाटबंधारे विभागाकडून यापूर्वीच महापालिकेकडे हस्तांतरीत झाली आहे. त्या जागेत जुन्या वाहिनीला समांतर ही नवीन जल वाहिनी टाकण्यात येईल. या कामासाठी अवाढव्य लोखंडी पाईप नियोजित मार्गात आणण्यात आले आहेत. सध्या लोखंडी पाईपवर गंज प्रतिबंधक प्रक्रिया सुरू असून आठवडाभरात खोदकाम होऊन प्रत्यक्ष पाईप टाकण्याचे काम सुरू होईल, असे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर यांनी सांगितले.
क्षमता कशी विस्तारणार ?
नाशिक शहरातील पाणी पुरवठ्यासाठी ७५ टक्के पाणी गंगापूर तर २५ टक्के पाणी मुकणे धरणातून घेण्यात येते. सद्यस्थितीत एकूण ५५५ दशलक्ष लिटर पाणी धरणातून घेतले जाते. यातील गंगापूर धरणातून अस्तित्वातील वाहिन्यांची क्षमता सुमारे ३०० दशलक्ष लिटर आहे. हे सर्व पाणी शहरातील सात केंद्रात शुद्धीकरण करून ११९ जलकुंभ आणि सुमारे अडीच हजार किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांमधून वितरित केले जाते. गंगापूर धरण ते बारा बंगला ही नवीन जलवाहिनी जुन्या वाहिनीला समांतर असणार आहे. नवीन जलवाहिनीची क्षमता २२ तासात ४२५ दशलक्ष लिटर पाणी वहनाची आहे. ती २४ तास कार्यरत राहिल्यास ही क्षमता ४६० दशलक्ष लिटरपर्यंत जाऊ शकते. शहराची २०५५ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून जलवाहिनीचे नियोजन झाल्याचे अधिकारी सांगतात.