नाशिक – स्थानिकांच्या विरोधामुळे चार वर्षांपासून रखडलेल्या वैतरणा-मुकणे धरणांना संलग्न करणाऱ्या प्रवाही वळण योजनेच्या कामास अखेर मुहूर्त लाभला आहे. यंदाच्या पावसाळ्यात उर्ध्व वैतरणाच्या सांडव्यावरून समुद्राला वाहून जाणारे एक टीएमसी पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा प्रयत्न आहे. प्रवाही वळण योजनेसाठी १५.५ टीएमसी दृष्टीने पायाभूत सुविधा उभारणी होत आहे.

इगतपुरी तालुक्यातील या योजनेसाठी सुमारे १०८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. २०२१ मध्ये या योजनेला मान्यता मिळाली होती. परंतु, स्थानिकांच्या विरोधामुळे हे काम रखडले. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मध्यस्तीनंतर त्यास सुरुवात होऊ शकल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगितले जाते. सद्यस्थितीत या योजनेचे काम २० टक्के झाले आहे. उर्ध्व वैतरणा धरण सह्याद्रीच्या माथ्यावर आहे. त्याचा सांडवा पश्चिमेकडे आहे. पावसात अतिरिक्त पाणी पश्चिमी वाहिनी नद्यांमधून अरबी समुद्रात वाहून जाते. प्रवाही वळण योजनेतून हे पाणी मुकणे धरणात आणले जाणार आहे. दोन दरवाजे बसवून दोन्ही धरणांच्या पाणी फुगवट्याला जोडले जाणार आहे.

प्रारंभी हा प्रकल्प एक टीएमसी पाणी वळविण्यासाठी मंजूर झाला होता. नंतर २०२१ राज्य सरकारने १६.टीएमसी पाणी वळविण्यासाठी मंजुरी दिली.

ही योजना पूर्णत्वास गेल्यानंतर एक टीएमसी म्हणजे एक हजार दशलक्ष घनफूट पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वापरण्यासाठी उपलब्ध होईल. याचा लाभ नाशिकसह मराठवाड्यालाही होणार आहे.

उर्ध्व वैतरणा धरणाची १२ टीएमसी क्षमता असून हे पाणी पूर्णपणे मुंबई महापालिकेला पिण्यासाठी दिले जाते. या धरणाच्या पश्चिमेला मुंबई महापालिका गारगाई आणि पिंजाळ ही स्वत:ची धरणे बांधत आहे. त्या धरणाची कामे पूर्णत्वास गेल्यानंतर गोदावरी खोऱ्यात उर्ध्व वैतरणातील पाणी मिळू शकेल, असे पाटबंधारे विभागाचे अधिकारी सांगतात.