नाशिक – पंचवटीतील तपोवन परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार असल्याने महोत्सव संस्मरणीय होण्यासाठी प्रशासन तयारीत मग्न आहे. दुसरीकडे, बहुतांश कामे ही एकाच कंपनीकडे देण्यात आल्यामुळे अधिकारी या वेगवेगळ्या कल्पनांबद्दल अनभिज्ञ आहेत.
राष्ट्रीय महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्ताने शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. सद्यस्थितीत तपोवनात पंतप्रधान मोदींचा ताफा जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती केली जात आहे. काही ठिकाणी महापालिकेच्या वतीने डांबरीकरण करण्यात येत आहे. दोन दिवसांपासून अग्निशमन बंबांच्या मदतीने रस्त्यांवर पाणी फवारुन धूळ काढली जात आहे. महोत्सवासाठी मोठ्या आकारात जर्मन तंत्रज्ञान वापरुन तंबु उभारण्यात येत आहेत. परराज्यातील ३०० पेक्षा अधिक कामगार सध्या मेहनत घेताना दिसून येत आहेत. मुख्यमंत्र्यांसह वेगवेगळ्या मंत्र्यांकडून कार्यक्रम स्थळांची पाहणी करुन आवश्यक सूचना प्रशासनाला देण्यात येत आहेत.
कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठे कंटेनर आले असून कंटेनरवर महोत्सवाचे शुभंकर, बोधचिन्ह आदी रेखाटण्यात येत आहेत. कंटेनरांचा वापर हा महोत्सवस्थळी भिंतीसारखा होणार असून खेळ, महोत्सवाशी संबंधित माहिती या ठिकाणी लावण्यात, रेखाटण्यात येत आहे. मुख्य म्हणजे प्रशासन तयारीत मग्न असले तरी ही सर्व कामे वरिष्ठ स्तरावर निश्चित झाली असून ते काम कंपन्यांना दिले गेल्याने नेमके काय सुरू याविषयी अधिकाऱ्यांना माहिती नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, कंटेनर्स प्रसिध्दीसाठी की रचनेसाठी, याविषयी माहिती नसल्याचे नमूद केले.
महापालिकेकडून कचरा संकलन
राष्ट्रीय युवा महोत्सव २०२४ अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहरात विशेष स्वच्छता अभियानास प्रारंभ झाला आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रात १२ ते १६ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहे.या महोत्सवाच्या अनुषंगाने शहरात विविध ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांनी महोत्सव पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांच्या क्षेत्रात असलेल्या सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, चौक, मोकळे भूखंड, क्रीडांगणे, नाले व नदीकिनारे इत्यादी ठिकाणी २६ जानेवारीपर्यंत दररोज विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना विभागप्रमुखांच्या बैठकीत दिल्या आहेत. शहरातील स्वयंसेवी संस्था, राष्ट्रीय स्वंयसेवा योजना विद्यार्थी यांची मदत घेण्यात येत आहेत.