वाडिवऱ्हे येथील पॉवर ड्रील कंपनी व्यवस्थापनाच्या जाचाला कंटाळून कामगार माधव माळी (३९) यांनी सोमवारी सकाळी कंपनीच्या प्रवेशद्वारावर विषप्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. माळी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, कंपनी व्यवस्थापनाने सहकार्य केले नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
पॉवर ड्रील कंपनीत व्यवस्थापन आणि कामगार यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून काही तांत्रिक मुद्यांवरून वाद सुरू आहेत. कंपनीत ३०० हून अधिक कामगार कार्यरत असून अनेकांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. याबाबत दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर, तोडगा निघावा यासाठी स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांनी तडजोडीचा प्रयत्न केला. दिवाळीनंतर कंपनी पूर्ववत झाल्यानंतर ३०० पैकी १५० कामगारांना कामावर घेण्यात आले. उर्वरित १५० कामगारांमध्ये माळी यांचा समावेश होता. व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी सोमवारी सकाळी कंपनीच्या प्रवेशद्वारावर विषारी औषध सेवन केले. हा प्रकार अधिकाऱ्यांनी पाहिला. त्यावेळी कामगारांनी विरोध करू नये किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उर्वरित कामगारांना तातडीने कंपनीच्या आवारात घेण्यात आले. मात्र माळी यांना कोणतीही वैद्यकीय मदत, वाहन व्यवस्था उपलब्ध करून न देता प्रवेशद्वारावर अत्यवस्थ अवस्थेत पडू दिले. वाहनचालकांना मदतीची विनवणी करत सहकाऱ्यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे औदार्य दाखविले नाही किंवा मदत केली नाही, असा आरोप माळी यांच्या नातेवाईकांनी केला.

Story img Loader