‘शोध’ या आपल्या पहिल्याच कादंबरीने वाचकांना वेड लावणारे ज्येष्ठ लेखक व निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, व्याख्याता आणि संघटक अशी चौफेर ओळख असलेले रंगकर्मी मुरलीधर खैरनार (वय ५६ )यांचे रविवारी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने २०१३ मध्ये कादंबरी लेखनासाठी जाहीर करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शिष्यवृत्तीचे प्रथम मानकरी मुरलीधर खैरनार ठरले. या शिष्यवृत्तीचा वापर करत त्यांनी लिहिलेल्या ‘शोध’ या कादंबरीचे जुलैमध्ये प्रकाशन झाले. ही कादंबरी इतकी लोकप्रिय ठरली की चारच महिन्यात दुसरी आवृत्ती प्रकाशित करावी लागली. केवळ लेखक म्हणून नव्हे, तर उत्तम रंगकर्मी म्हणून ते प्रसिध्द होते. चाहत्यांमध्ये ‘मुरलीकाका’ अशी त्यांची ओळख होती. ‘लोकसत्ता’ च्या ‘लोकांकिका’ या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित एकांकिका स्पर्धेत नाशिक केंद्रावरील अंतिम फेरीत परीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले.